पालकमंत्री आदित्य ठाकरे यांची एमएमआरडीए कार्यालयास भेट
मुंबईतील विविध चालू तसेच प्रस्तावित विकासप्रकल्पांचा घेतला आढावा
मुंबई डेस्क, दि. १३ जानेवारी: राज्याचे पर्यावरण तथा वातावरणीय बदल, पर्यटन, राजशिष्टाचार मंत्री तसेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या वांद्रे कुर्ला संकूल येथील कार्यालयास भेट दिली. मुंबईतील विविध विकास प्रकल्पांचा आढावा यावेळी ठाकरे यांनी घेतला. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे वेळोवेळी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांमार्फत या पद्धतीचा आढावा घेतात, त्याप्रमाणेच त्यांची आजची भेट होती.
आजच्या आदित्य ठाकरे यांच्या मुंबई महानगर विकास प्राधिकरण कार्यालय भेटीदरम्यान त्यांनी पश्चिम द्रूतगती महामार्ग, वरळी-शिवडी कनेक्टर, नरिमन पॉईंट- कफ परेड कनेक्टर, कलानगर उड्डाणपूल, धारावी टी जंक्शन ते पश्चिम द्रूतगती महामार्ग उड्डाणपूल या विकासकामांच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त श्री. आर. ए. राजीव, अतिरिक्त महानगर आयुक्त डॉ. के. एच. गोविंदराज, मुंबई महानगपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू, एमएमआरडीएचे सह महानगर आयुक्त बी. जी. पवार तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पश्चिम द्रूतगती महामार्गावरील दहिसर ते माहिमपर्यंत प्रस्तावित WEH रोड सरफेस अपग्रेड आणि सौंदर्यीकरणाचे काम चालू आहे. ट्रॅफिक मॅनेजमेंट, टनेल, ब्रिजखालील अर्बन स्पेस यांचे काम लवकरच सुरू होत आहे. पश्चिम द्रूतगती महामार्गावर रेन वॉटर हार्वेस्टिंग तसेच तो हरित करण्याबाबत यावेळी मंत्री आदित्य ठाकरे यांनी सूचना केल्या.
मुंबई महापालिका बनवत असलेला कोस्टल रोड आणि मुंबई महानगर विकास प्राधिकरण बनवत असलेला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पूर्ण झाल्यानंतर वरळी-शिवडी कनेक्टर खूप महत्त्वाची भुमिका बजावणार आहे. या प्रकल्पांचे काम कालबद्ध मर्यादेत पूर्ण होण्यासाठी वेळोवेळी या कामांचा आढावा घेण्यात येत आहे. या प्रकल्पांच्या प्रगतीची मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी माहिती घेतली.
कफ परेड कनेक्टर हा प्रकल्प मच्छिमारांच्या बोटींना कसलाही अडथळा निर्माण होऊ न देता या व्यवसायीक व निवासी क्षेत्रातील वाहतूक सुलभ करेल. या प्रकल्पासाठीचे डिझाइन जूनपर्यंत तयार असेल. या प्रकल्पाच्या प्रगतीचीही मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी माहिती घेतली. हे सर्व प्रकल्प मुंबईच्या प्रवास सुलभतेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे प्रकल्प आहेत.
मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगर विकास प्राधिकरण कार्यालयाच्या भेटीनंतर वांद्रे कुर्ला संकूल ते नंदादिप गार्डन, पश्चिम द्रृतगती महामार्ग या उड्डाणपुलाच्या कामाची स्थळपाहणी केली. यावेळी श्री. ठाकरे यांनी कार्य कशा पद्धतीने चालू आहे याची पाहणी करीत, हे काम करणाऱ्या कंत्राटदार तसेच या प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत संवाद साधला. या स्थळपाहणी दरम्यान प्रस्तावित धारावी टी जंक्शन ते नंदादीप उद्यान, पश्चिम द्रूतगती महामार्ग या उड्डाणपुलाच्या कामासंदर्भात देखील माहिती घेतली.
आदित्य ठाकरे यांनी कलानगर उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली. या कामांचा आढावा घेत असताना उड्डाणपुलाखालील भागाचे सुशोभिकरण, ग्रीन स्पेसमध्ये वाढ करणे, नंदादीप गार्डनचा विस्तार, प्रस्तावित कलानगर जंक्शन गार्डन आणि बीकेसी आर्ट डिस्ट्रिक्ट योजनांवरही चर्चा केली.
ही विकासकामे जोमाने सुरू असतानाच मुंबईतील उड्डाणपुलाखालील जागांमध्ये ग्रीन स्पेस निर्माण करणे तसेच ती जागा सर्वसामान्य जनतेच्या वापरासाठी तयार करणे, अशा जागांचा उपयोग खेळण्यासाठी, बसण्यासाठी, चालण्यासाठी एकंदरीतच मुंबईतील धकाधकीच्या जीवनात मुंबईकरांना थोडासा विरंगुळा मिळू शकेल यासाठी व्हावा हा आदित्य ठाकरे यांचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने आदित्य ठाकरे नेहमी अधिकाऱ्यांना सुचित करीत असतात.
Comments are closed.