Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महामेट्रो नागपूरला गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नागपूर 6 डिसेंबर :- महामेट्रो नागपूर अंतर्गत वर्धा रोडवरील ‘डबलडेकर व्हाया-डक्ट’ची संपूर्ण जगात मेट्रो श्रेणीतील सर्वात लांब डबलडेकर म्हणून अशी अधिकृत ओळख ठरली असून याच कारणास्तव अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या गिनिज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या डबलडेकरची नोंद झालेली आहे. या ३.१४ किमी लांबीच्या ‘डबल डेकर व्हाया-डक्ट’ला आशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये या आधीच मानांकन मिळाले असून नागपूरच नाही तर संपूर्ण देशासाठी ही अभिमानाची बाब असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकारी यांच्याकडून प्रमाणपत्र प्राप्तीच्या मेट्रो भवन मध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात दिली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महामेट्रो यांच्या सहकार्याने तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून हा बहुस्तरीय डबलडेकर तयार झाला आहे.

स्थापत्यकलेचा आणि अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा उत्तम आणि अभिजात दर्जा म्हणून या डबलडेकरची ओळख राहील. महामेट्रोच्या जवळपास ११ हजार कर्मचारी यांनी दिवसरात्र अथक प्रयत्न करून या विक्रमी डबलडेकरचे काम पूर्णत्वास नेले आहे. या डबलडेकरमुळे नागपूरकरांना उत्तम अशी वाहतूक सेवा मिळणार असल्याची खात्री त्यांनी व्यक्त केली. महामट्रो येत्या काळात वाहतूक सेवेसोबत विविध सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करीत राहणार आहे. नागपूर मेट्रोच्या मंजुरीत ४० किमी पैकी २६.५ किमीचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम सुद्धा लवकर पूर्ण होईल. आजपर्यंत नागपूर मेट्रोने ९५००० पर्यंतची प्रवासी क्षमता पूर्ण केली असून मेट्रो फेज -२ नंतर ही प्रवासी क्षमता दीड लाखा पर्यंत जाणार असल्याची खात्री त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

येणाऱ्या काळात नागपूर जवळील काही ग्रामीण भाग हा नागपूर मेट्रोशी जोडल्या जाणार असून नागपूर मेट्रोची व्याप्ती ही सर्वदूर राहील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. नागपूर मेट्रोला अभूतपूर्व आणि अकल्पनीय असा प्रतिसाद मिळाला असून महाविद्यालयीन विद्यार्थी, मजूर, कर्मचारी आणि विशेष करून महिला वर्गाचा प्रतिसाद हा अत्यंत प्रेरक आहे. कार्यक्रमा दरम्यान महामेट्रो नागपूरची आजवरची कामगिरी लघु चित्रफिती द्वारे दाखविण्यात आली.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.