हिंगणघाट प्राध्यापक जळीत हत्याकांड आरोपीचा वकील गैरहजर पुढील सुनावणी जानेवारीत
अधिवक्ता निकम यांची पत्रकारांना माहिती
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वर्धा दि.१४ डिसेंबर: हिंगणघाट येथील युवतीला पेट्रोल टाकून जिवंत जाळल्या प्रकरणात आरोपी विक्की नगराळे याच्या शिक्षेच्या सुनावणीसाठी सरकारी पक्षाकडून आज १४ रोजी प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम येथील न्यायालयात बाजू मांडण्यासाठी हजर झाले. मात्र, आरोपी नगराळे यांचे वकील गैरहजर राहिल्याने आता ही सुनावणी जानेवारी २०२१ मध्ये होण्याची शक्यता अधिवक्ता उज्जवल निकम यांनी पत्रकारांसोबत बोलतांना सांगितले.
सरकारतर्फे न्यायालयात काही आरोप प्रस्तावित करण्यात आले होते. परंतु, आरोपीचे वकील गैरहजर असल्याने १५ दिवसांनी खटल्याची सुरुवात केली जाण्याची मागणी न्यायालयाकड़े केली असून न्यायालयाने ही बाब मान्य केल्याने खटल्यातील प्रत्यक्ष पुराव्याची साक्षीदाराची सुनावणी करीत कामकाज जानेवारी २०२१ च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात सुरु होईल अशी माहिती शासनाचे अधिवक्ता उज्वल निकम यांनी दिली.
आज दुपारी १२ वाजता पोलिसांनी आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याला न्यायालयात हजर केले होते. पेशाने प्राध्यापिका असलेल्या अविवाहित तरुणीस भरदिवसा जाळल्याप्रकरणी जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश माजगावकर यांचे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. यावेळी सुप्रसिद्ध अधिवक्ता उज्वल निकम यांनी न्यायालयात पैरवी केली.
आरोपी विक्की उर्फ विकेश नगराले याने मृतक प्राध्यापिका हीचा एकतर्फी प्रेमातुन जीवंतपणे जाळुन तिचा सूड उगविला. ३ फेब्रुवारी रोजी घडलेल्या घटनेबद्दल हिंगणघाट तालुक्यात तसेच महाराष्ट्रात रोष व्यक्त करण्यात आली. जनता आणि लोकप्रतिनिधी तसेच मृतकाच्या कुटुंबियांनी केलेल्या मागणीनंतर शासनाने याची विशेष दखल घेतली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुप्रसिद्ध अधिवक्ता उज्वल निकम यांची नियुक्ती करीत तात्काळ न्यायालयीन कारवाई सुरु करण्याची घोषणा केली.
परंतु, यादरम्यान कोविड-१९ च्या संहितेमुळे न्यायालयीन प्रक्रिया स्थगित राहिली. आता मात्र लवकरच खटल्याचे कामकाज सुरु होणार असल्याची ग्वाही यावेळी एड. निकम यांनी दिली.
Comments are closed.