Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

खोब्रामेंढा चकमकीत पाच नक्षलवादी ठार, जहाल नक्षली भास्कर हिचामीचा समावेश

पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर नक्षल साहित्य केले जप्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. २९ मार्च: आज भल्या सकाळी कुरखेडा तालुक्यातील खोब्रामेंढा परिसरातील पानडोंगरी जंगलात पोलिसांशी झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले. या पाचही नक्षल्यांवर ४३ लाख रुपयांचे बक्षीस होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यात नक्षल्यांच्या उत्तर गडचिरोली विभागीय समितीचा सचिव भास्कर हिचामी, अस्मिता, अमर, सुखदेव आणि सुजाता यांचा समावेश आहे.

पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील व पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, २७ मार्चपासून नक्षलविरोधी अभियानाचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया यांच्या नेतृत्वात खोब्रामेंढा परिसरात पोलिसांच्या सी-६० पथकाचे जवान विशेष अभियान अभियान राबवीत होते. त्यादिवशीही तेथे चकमक झाली. त्यावेळी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर नक्षल साहित्य जप्त केले होते. आज सकाळी त्याच परिसरातील पानडोंगरी जंगलात पोलिसांशी चकमक उडाली. त्यात भास्कर हिचामी, अस्मिता, अमर, सुखदेव आणि सुजाता हे नक्षलवादी ठार झाले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

भाक्सर हिचामी उर्फ ऋषी रावजी उर्फ पवन हा दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा सदस्य होता. तसेच तो उत्तर गडचिरोली विभागीय समितीचा सदस्य होता. त्याच्यावर १५५ गुन्हे दाखल असून, शासनाने त्याच्यावर २५ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.

राजू उर्फ सुखदेव बुधेसिंग नैताम हा टिपागड एलओएसचा उपकमांडर होता. त्याच्यावर १४ गुन्हे असून, शासनाने त्याच्यावर १० लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. अमर कुंजाम हा कसनसूर एलओएसचा सदस्य होता. त्याच्यावर ११ गुन्हे दाखल असून, शासनाने २ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. सुजाता उर्फ कमला उर्फ पुनिता गावडे उर्फ आत्राम ही टिपागड एलओएस प्लाटून क्रमांक १५ ची सदस्य होती. तिच्यावर ३१ गुन्हे दाखल असून, ४ लाख रुपयांचे बक्षीस होते. अस्मिता उर्फ सुखलू पदा ही टिपागड एलओएसची सदस्य होती. तिच्यावर ११ गुन्हे दाखल असून, २ लाख रुपयांचे बक्षीस होते, असे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी सांगितले.

२०१९ मध्ये दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीची सदस्य आणि गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल चळवळीची प्रमुख नर्मदाक्का हिला पोलिसांनी तिच्या पतीसह अटक केल्यानंतर जिल्ह्यातील नक्षल चळवळीची सर्व सूत्रे भास्कर हिचामी याच्याकडेच आली होती. परंतु आज त्याचा खात्मा करण्यात आला. हा नक्षल्यांना मोठा धक्का आहे. ठार झालेल्या नक्षल्यांचे मृतदेह आज दुपारी गडचिरोली येथील पोलिस मुख्यालयात आणण्यात आले आहेत. दरम्यान दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी सदस्य चकमकीत ठार होण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच वेळ आहे. नक्षल्यांनी आत्मसमर्पण करावे अन्यथा त्यांना गोळीनेच उत्तर दिले जाईल, असे पोलिस अधीक्षक अंकित गोयल म्हणाले.

Comments are closed.