गृहमंत्री अमित शाह, फडणवीसांसह भाजप नेते अर्णब गोस्वामींच्या समर्थनार्थ मैदानात.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
मुंबई, दि. ०४ नोव्हेंबर: रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अलिबाग पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अर्णब गोस्वामींच्या अटेकवरुन महाराष्ट्र सरकार विरुद्ध भाजप अशी जुंपली आहे. अमित शाहांपासून ते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी अर्णब यांच्या अटकेचा निषेध केला आहे. तसंच महाराष्ट्रात ही अघोषित आणीबाणी असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे.
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे की, काँग्रेस आणि त्याच्या मित्रपक्षांनी लोकशाहीला पुन्हा एकदा लज्जित केले आहे. रिपब्लिक टीव्ही आणि अर्णब गोस्वामी यांच्याविरूद्ध राज्य सत्तेचा स्पष्टपणे गैरवापर करणे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला आहे. ही घटना आणीबाणीच्या परिस्थितीची आठवण करून देते. पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर हा हल्ला आहे, याचा प्रतिकार केला जाईल, असं शाह यांनी म्हटलं आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, आणिबाणी 1977 मध्ये संपुष्टात आली, पण मानसिकता कायम आहे. आणीबाणीचे समर्थन करणारी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यावर त्याच मानसिकतेचे प्रदर्शन करीत आहेत. सरकारविरोधी प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी घातक आहे. अशा प्रत्येक दडपशाहीविरुद्ध संघर्ष करणे हाच भारताचा नारा आहे, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.
Comments are closed.