Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोलीत विद्यार्थ्यांसाठी उच्चशिक्षणाचा ‘संकल्प’

डॉ.पंकज नरुले यांचा पुढाकार : देशातील नामांकित विद्यापीठात विद्यार्थी दाखल

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 24 डिसेंबर  : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात शैक्षणिक उदासीनता मोठ्या प्रमाणात आहे. गरिबी, योग्य मार्गदर्शन न मिळणे आणि दुर्गमता आदी कारणांमुळे विद्यार्थी शैक्षणिक संधींपासून वंचित राहतात. या परिस्थितीत गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी देश-विदेशातील नामांकित विद्यापीठात शिक्षण घ्यावे, त्यासाठी विविध संधी, फेलोशीप बाबत माहीती देवून त्यांना चालना देण्याचा संकल्प गडचिरोलीतील एका प्राध्यापकाने करत आदर्श निर्माण केला आहे. डॉ.पंकज नरुले असे त्यांचे नाव असून शिवाजी महाविद्यालय चामोर्शी येथे प्राध्यापक म्हणून मागील १० वर्षांपासून कार्यरत आहे. शिक्षण विषयक संधींचे विकेंद्रीकरण व्हावे म्हणून त्यांनी संकल्प फाउंडेशनची स्थापना केली. गेल्या ५ वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात शैक्षणिक कार्यशाळा, निवासी शिबिरे व मार्गदर्शन कार्यक्रमातून शैक्षणिक वातावरण निर्मिती डॉ.पंकज नरूले यांनी केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील विद्यार्थी पुणे, मुंबई, नागपूर, बंगलोर, भोपाळ आदी ठिकाणी असलेल्या अझीम प्रेमजी विद्यापीठ, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, फर्ग्युसन कॉलेज, गरवारे महाविद्यालय, मातृसेवा संघाच्या नामांकित विद्यापीठ व महाविद्यालयात शिकत आहे. डॉ.नरुले यांच्या मार्गदर्शनात मागील वर्षी ११ व यंदा २८ विद्यार्थी देशातील नामांकित विद्यापीठात शिक्षण घेत आहे. शिवाय देशपातळीवर नामांकित असणारी गांधी फेलोशीप दोन विद्यार्थ्यांना तर एसबीआय युथ फेलोशीप एका विद्यार्थ्याला मिळाली असून ते सामाजिक बदलांसाठी जमीनीस्तरावर योगदान देत आहेत. संकल्प फाऊंडेशनच्या माध्यमातून डॉ.पंकज नरुले यांच्यासोबत प्रा.पुनीत मातकर,चेतना लाटकर, डॉ.मेघा सालोरकर, भुपेश फुलझेले, इतिहास मेश्राम, परमेश्वर जोगदंडे,संदीप साबळे कार्यरत असून आदिवासीबहुल भागातील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाच्या संधीबाबत मार्गदर्शन करत योगदान देत आहेत.

यंदा गडचिरोलीतील ५० हून अधिक विद्यार्थ्यांची केंद्रीय विद्यापीठांच्या तर शेकडो विद्यार्थ्यांची अझीम प्रेमजी विद्यापीठांच्या पूर्वचाचणीची तयारी डाॅ.नरुले संकल्प फाऊंडेशनच्या माध्यमातून करत आहेत. देशातील नामांकित संस्थेत शिक्षण घेतलेले अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठाचे विशाल ठाकरे, आंतरराष्ट्रीय चेव्हनिंग स्काॅलर ॲड.दीपक चटप, इरास्मूस मुंड्स स्काॅलर ॲड.बोधी रामटेके, देशातील नामांकित विद्यापीठातून शिक्षण घेतलेले कार्तिक चित्रकार, ममिता मडावी, गणेश पंडित, अमन सिरसाट,सुस्मिता हेपटे, मयूर लुटे आदींचे थेट मार्गदर्शन विद्यार्थ्यांना डॉ.नरुले यांनी उपलब्ध करुन दिले आहे. सामाजिक कार्यकर्ते अविनाश पोईनकर, रवी चुनारकर, अभय पेंदाम, कुणाल नक्षीने यांचेही सहकार्य लाभत आहे. शिक्षकांचे काम हे केवळ पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम शिकविणे इतके मर्यादित नाही. नव्या पिढीतील विद्यार्थी घडविणे, त्यांना योग्य दिशा दाखवून मार्गक्रमण करायला लावणे हे मुख्य कार्य असायला हवे. मार्गदर्शन कार्यशाळेतून विद्यार्थ्यांत उच्च शिक्षणाची प्रेरणा निर्माण होते. त्यानंतर विद्यार्थ्यांशी सातत्याने संपर्कात राहून काम करावे लागते. या संपूर्ण कामात झोकून देत डॉ.नरुले संकल्प संस्थेच्या माध्यमातून स्व:खर्चातून व लोकसहकार्यातून अविरतपणे काम करत असून गडचिरोली जिल्ह्यातील उच्चशिक्षणात त्यांचे योगदान उल्लेखनीय व दखलपात्र ठरत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

सुनील केदार मायग्रेनमुळे ऑक्सिजनवर, शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या दाखल करण्यात आलं.

Comments are closed.