Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अगतिकतेचा फायदा घेऊन जव्हार मधील दोन मुलींची ५०० रुपयांत खरेदी

जव्हार मधील एका मुलीला मालकाने गुपचुप आणून सोडले, तर दुसरी मुलगी अजूनही बेपत्ता.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

जव्हार/भिवंडी दि.20 सप्टेंबर :-   नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी तालुक्यातील कातकरी पाड्यांवरील कोवळ्या मुलांची एक मेंढी आणि ५०० ते ५ हजार रुपये देऊन खरेदी करण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव श्रमजीवी संघटनेच्या पाठपुराव्यामुळे उघडकीस आले होते. परंतु या बाल वेठबिगारीच्या पाशात नशिकच नव्हे तर ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील आदिवासी कातकरी मुले अडकल्याचे समोर आले आहे. जव्हार तालुक्यातील धारनहट्टी येथील नरेश भोये यांच्या दोन अल्पवयीन मुलींना मेंढ्या चारण्यासाठी अवघ्या १२ हजार रुपये आणि एक मेंढी देण्याचे आश्वासन देऊन मेंढपाळ अमानुषपणे राबवत होता. त्यातील एका मुलीला त्यांनी अचानक जव्हारला परस्पर आणून सोडले, तर दुसरी मुलगी अद्याप बेपत्ता आहे. याप्रकरणी जव्हार पोलीस ठाण्यात आरोपी मालका विरोधात बालमजुरीसह वेठबिगारीचा गुन्हा दाखल झालेला आहे. तर, दुसरीकडे भिवंडी तालुक्यात देखील दोन अल्पवयीन मुलांना राबविल्या प्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत.

नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील उभाडे शिवारातील गौरी आगिवले या १० वर्षीय बालिकेच्या संशयास्पद मृत्यूने बाल वेठबिगारीसाठी मुलांची खरेदी करणारे रॅकेट उघडकीस आले. त्यानंतर प्रशासनाने नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात श्रमजीवी संघटनेच्या मदतीने अशा मुलांची शोध मोहीम राबवली जात आहे. याद्वारे अल्पवयीन मुलं खरेदी करून त्यांना राबवणाऱ्या मेंढपाळ आणि दलालांना चांगलीच धडकी भरली आहे. पार या सावकारी वृत्तीच्या लोकांनी ठाणे, नाशिक, पालघर जिल्ह्यातील गरीब कातकरी मजुरांच्या दारिद्र्य आणि अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांच्या कोवळ्या बालकांना 500- 1000 रुपये देऊन अक्षरशः गुलाम म्हणून खरेदी केले होते. नाशिक- नगर जिल्ह्यातील या घटना ताज्या असतानाच जव्हार येथील मुलगी आणि भिवंडी तालुक्यातील 2 मुलांना श्रमजीवी संघटनेने मुक्त केले असून तीन वेगवेगळ्या गुन्ह्याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मनिषा नरेश भोये व काळू नरेश भोये या जव्हारच्या धारणहट्टी येथील वय वर्षे 8 व 6 वर्षाच्या या मुलीअहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील तळेगाव येथील मेंढपाळ पुंडलिक कांदाडकर, देवराम कांदाडकर याच्याकडे बाल मजुरी करत होत्या. मनिषा 3 वर्षांपासून तर काळू 1 वर्षांपासून बाल मजुरी करत होती. मनिषाला पुंडलिक यांने दिनांक 17 तारखेला शिरपामाळ जव्हार येथे गुपचूप सोडले, या घटनेची माहिती श्रमजीवीचे रवींद्र वाघ यांना मिळताच संघटनेचे कार्यकर्ते या प्रकरणात पुढे आले. मनिषाच्या वडिलांना कांदाडकर यांनी मनिषाच्याचे मजुरीचे वर्षाला 12 हजार आणि एक मेंढी असे ठरविले होते. परंतु सुरवातीला रू.500 व्यतिरिक्त काहीही दिलेले नाही. या मालकाने मनिषाला शेण भरणे , लेंड्या साफ करणे, दुध काढणे मेंढ्यांबरोबर फिरणे, पाणी आणणे, पाजणे मेंढ्या व गाईची सफाई करणे अशी अनेक कामे देऊन रबवून घेतले. याबाबत जव्हार पोलीस ठाण्यात श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांच्या पुढाकारणे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. यात मनीषाची बहीण काळू नरेश भोये ही अद्यापही बेपत्ता असून तीचाही शोध सुरु आहे. श्रमजीवी संघटनेचे रवींद्र वाघ, संतोष धिंडा, सोमनाथ भोये, सीता घाटाळ इत्यादीनी या कुटुंबाला गुन्हा दाखल करणे कमी मदत तर केलीच पण त्यांना तातडीने रेशनकार्ड मिळवून दिले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

भिवंडीतील आणखी दोन गुन्हे दाखल

भिवंडीतील वडवली खोताचा पाडा येथील सांगिता पवार या कातकरी महिलेने तक्रार दाखल केली आहे. राहुल नावाच्या आपल्या 17 वर्षीय मुलाला कर्जत तालुक्यातील ताजू येथील भिवा गोयकर या मेंढपाळाने वेठीबिगार म्हणून ठेवले असल्याचे तीने सांगितले ,मालक भिवा राहुलला खूप त्रास शिवीगाळ करायचा,खूप काम. करून घ्यायचा अखेर मालकाच्या जाचाला कंटाळून राहुल घरी परतला, श्रमजीवी संघटनेने लहान मुलांच्या बांधबिगारीला पुन्हा एकदा उजेडात आणल्याने संगीता पवार हिने देखील पुढे येत मालकावर गुन्हा दाखल केला आहे.

भिवंडी मधील वाफाळे सगपाडा येथील सीता रामू वाघे या कातकरी महिलेने देखील आपल्या 12 वर्षीय मुलाच्या अरुण वाघेच्या बालमजुरी आणि वेठीबिगारीची तक्रार दिली आहे. गरिबी आणि अज्ञान याचा गैरफायदा घेत संभाजी खताळ या नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील मेंढपाळाने या 12 वर्षाच्या अरुण ना मजूर म्हणून 500 रुपये देऊन एक प्रकारे विकत घेतले. तिकडे नेऊन या मुलाकडून कामं करून घेतली आणि जसे हे बालमजुरी, वेठीबिगारी प्रकरण श्रमजीवी संघटनेने उजेडात आणल्यानंतर संभाजीने अरुणला घरी आणून सोडून दिले. या दोनही प्रकरणात पडघा पोलीस ठाण्यात बालकामगार प्रतिबंधक अधिनियम 1986 आणि बंधबिगार पद्धतीन (उच्चाटन) अधिनियम 1976 तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम (ऍट्रॉसिटी)च्या विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल झाले असून पडघा पोलीस ठण्यात या पीडित कुटुंबासोबत श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते जया पारधी, केशव पारधी, आशा भोईर, मारुती भांगरे इत्यादी उपस्थित होते.

श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून विक्री झालेल्या मुलांची शोधमोहीम

श्रमजीवी संघटनेचे संस्थापक तथा, राज्य स्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) श्री. विवेक पंडित मार्गदर्शनाखाली श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून अशा कातकरी आदिवासींच्या गरिबीचा, अज्ञानाचा आणि अगतिकतेचा फायदा घेऊन विक्री झालेल्या मुलांची शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमे अंतर्गत नाशिक ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून विक्री करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलांना शोधण्यात तसेच, त्यांच्या मालकांविरोधात (मेंढपाळ) विरोधात गुन्हे दाखल करण्यात श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकारयांना यश आले आहे.श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक (भाऊ ) पंडित यांनी स्वतः नाशिक आणि अहमदनगर तसेच, जव्हार इत्यादी ठिकाणच्या पीडित कुटुंबांची आणि संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. गेले अनेक दिवस पंडित स्वतः या प्रकारणांकडे लक्ष ठेऊन आहेत. “कातकरी कुटुंब गरिबी आणि अज्ञानामुळे या अत्याचाराला बळी पडत आहे. म्हणूनच माझ्या सर्व कार्यकर्त्यांना कातकरी वाड्यांवर जाऊन कातकरी कुटुंबाचे अश्रू पुसण्याचे काम करावे” , तसेच “या प्रश्नावर शासन आणि प्रशासनाने तात्काळ युद्ध पातळीवर पाऊले उचलून संवेदनाक्षम, सामाजिक भान ठेऊन काम करण्याची आवश्यकता आहे.” अशी अपेक्षा विवेक पंडित यांनी व्यक्त केली आहे.

हे देखील वाचा :-

Comments are closed.