Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आदिवासी लाभार्थी केंद्रबिंदू ठेवून काम करावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके

दुर्गम गावांसाठी रस्ते, पूल व स्मशानभूमीचे नियोजन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली : दुर्गम भागातील प्रत्येक गावासाठी रस्ते, पूल व स्मशानभूमी उभारण्याचे नियोजन करण्यात यावे, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी काल दिले. त्यांनी पावसाळ्यात कोणत्याही गावासाठी रस्ते व पूल नसल्याची स्थिती राहू नये यासाठी यंत्रणेला प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. त्यासाठी लागणारा निधी पुरविण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

आदिवासी विभागाच्या निधीतून सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी डॉ. उईके यांच्या अध्यक्षतेखाली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात बैठक पार पडली. आमदार डॉ. मिलींद नरोटे, गडचिरोली प्रकल्प अधिकारी राहुल मीना, भामरागड प्रकल्प अधिकारी नमन गोयल, अहेरी प्रकल्प अधिकारी कुशल जैन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे, पशुसंवर्धन उपायुक्त विलास गाडगे तसेच इतर विभागांचे प्रमुख अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
बैठकीत आदिवासी विकास विभागाच्या निधीतून सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेण्यात आला. मंत्री डॉ. उईके यांनी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी निधीचे योग्य प्रकारे वापर होत आहे का, यावर चर्चा केली. तसेच प्रलंबित कामे, त्यामागील अडचणी व त्यावर उपाय याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. जिल्ह्यातील सर्व विकासकामे गुणवत्तापूर्वक आणि गतीने आणि पूर्ण करण्याचे त्यांनी सांगितले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मंत्री उईके यांनी सार्वजनिक बांधकाम व जलजीवन योजनेंतर्गत झालेल्या कामांची तपासणी करण्यासाठी चौकशी समित्या नेमण्याचे निर्देश दिले. त्यांनी सांगितले की, “प्रत्येक मंजूर कामाचे नियमितपणे निरीक्षण करण्यात यावे व अडचणी त्वरित सोडवाव्यात.” अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्याच्या उद्देशानेच हा दौरा करण्यात आला असून यापूढे मंजूरी मिळालेल्या कामांचा नियमित आढावा घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

वनविभाग, जिल्हा परिषदेचा कृषी विभाग, ग्रामीण विकास यंत्रणा, शिक्षण व विद्युत विभागांच्या कामांचा स्वतंत्र आढावा घेण्याचे निर्देशही प्रकल्प अधिकाऱ्यांना देण्यात आले. यासोबतच, ग्रामस्थांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधीचा उपयोग योग्यरित्या करण्याचे आवाहन करण्यात आले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचा आढावा
जिल्ह्यातील भामरागड, गडचिरोली व अहेरी या तीन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचा आढावा घेतांना आदिवासी समाजाच्या लाभार्थ्यांसाठी हे कार्यालय स्थापन करण्यात आले आहे व आपण त्यांच्या सेवेसाठी येथे कार्यरत असल्याची भावना जोपासण्याचे आणि आदिवासी लाभार्थी हा आपला केंद्रबिंदू ठेवून काम करण्याचे आवाहन त्यानी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना केले. आपल्याकडे येणाऱ्या लाभार्थीला योग्य मार्गदर्शन करावे, शासनाच्या योजनांची माहिती कार्यालयाच्या दर्शनी भागात लावून त्यांना समजावून सांगावी, त्यांचेशी दोन शब्द गोड बोलून त्यांचा सन्मान करावा व त्यांची कामे प्राधाण्याने करावी, अशा सूचना मंत्री डॉ. अशोक उईके यांनी यावेळी दिल्या. या बैठकीत आदिवासी विकास विभाग आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.