Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

विद्यापीठातील कॅश काऊंटर आता ‘कॅशलेस’-विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

नागपूर, 18 मे – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वित्त विभागातील कॅश काउंटर आता ‘कॅशलेस’ होणार आहे.‌ विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे शुल्क भरण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वेळेत बचत होणार आहे. शिवाय रोकड देखील सोबत बाळगण्याची गरज भासणार नाही. विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यास होत असलेली असुविधा लक्षात घेता विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली वित्त व लेखा अधिकारी डॉ. हरीष पालीवाल यांनी ही ऑनलाईन शुल्क भरणा प्रणाली लागू केली आहे. विद्यापीठाच्या पदव्यूत्तर शैक्षणिक विभागातील विद्यार्थ्यांना प्रवेशशुल्क त्याचप्रमाणे संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना इतर कोणतेही शुल्काचा भरणा पूर्वी रोखीने करावा लागत होता. विद्यापीठ पदव्यूत्तर शैक्षणिक विभागातील विद्यार्थ्यांना प्रवेश तसेच इतर कोणतेही शुल्क आता ऑनलाईन भरता येणार आहे.

विद्यापीठ पदव्यूत्तर शैक्षणिक विभाग तसेच संलग्नित महाविद्यालयाद्वारे विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे शुल्क भरता यावे म्हणून rtmnu.unisuite.in या संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांच्या ईमेलवर किंवा मोबाईल क्रमांकावर लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या लिंकवर विद्यार्थ्यांना UPI/NEFT/RTGS/Debit Card/Credit Card इत्यादी मार्फत शुल्क भरता येणार आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांना किंवा तेथील विद्यार्थ्यांना वेगवेगळे शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे. वित्त व लेखा विभागाकडून संबंधित महाविद्यालयांच्या / विद्यार्थ्यांच्या ईमेलवर किंवा मोबाईल क्रमांकावर लिंक उपलब्ध करून दिली जाणार आहे. या लिंकवर महाविद्यालयांना/विद्यार्थ्यांना विविध ऑनलाईन पर्यायांचा वापर करून शुल्काचा भरणा करता येणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

विद्यापीठातील कॅश काउंटरवर यापुढे रोखीने किंवा धनाकर्षाद्वारे शुल्क स्वीकारले जाणार नाही. त्यामुळे कॅश काऊंटर आता कॅशलेस होणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुविधेकरिता विद्यापीठ प्रशासनाकडून नवनवीन उपक्रम राबविले जात आहे. शुल्क भरण्याकरिता ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिल्याने विद्यार्थ्यांच्या वेळेची बचत होणार आहे. विद्यार्थ्यांनी या प्रणालीचा लाभ घेण्याचे आवाहन कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, वित्त व लेखा अधिकारी डॉ. हरीष पालीवाल, उपकुलसचिव (लेखा) डॉ. रमण मदने यांनी केले आहे. अशी आहे प्रणाली विविध प्रकारच्या शुल्काचा भरणा करण्यास वित्त विभागातील कॅश काऊंटरवर गेल्यानंतर पावतीची नोंद घेत विद्यार्थ्यांच्या ईमेल किंवा मोबाईल क्रमांकावर लिंक पाठविण्यात येईल. या लिंकवर विद्यार्थ्यांना विविध स्वरूपाच्या शुल्काचा भरणा ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे.

Comments are closed.