डीटीपी म्हणजे काय ?
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
डेस्क टॉप पब्लिशिंग या छपाईच्या पद्धतीच्या नावाचे लघुरूप म्हणजे डीटीपी. १९८० च्या दशकापर्यंत कोणत्याही पुस्तकाचे, मासिकाचे, वर्तमानपत्राचे प्रकाशन एवढेच काय पण लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेची छपाई करायची तर अनेक सोपस्कार करावे लागत.
प्रथम हाताने लिहिलेल्या मजकुराची छापखान्यातील खिळे जुळवून चौकट तयार करावी लागायची. ती वापरून एका कागदावर तिचे प्रतिबिंब उमटावे लागायचे. ही झाली कच्ची छपाई. मग त्या कागदाचे वाचन करून त्यातल्या चुका दुरुस्त कराव्या लागायच्या. त्या करणेही कठीण असायचे. त्या दुरुस्त करताना नव्याने काही चुका व्हायच्या. अशा मुद्रितशोधनाच्या तीन चार फेऱ्या झाल्यानंतर मुद्रणप्रत तयार व्हायची. तरीही त्यात शीर्षकासाठी कोणत्या साईजचा फाँट वापरायचा, उपशीर्षकासाठी कोणता वापरायचा वगैरे कटकटी होत्याच.
वर्तमानपत्रामध्ये तर एकाच पानात अनेक प्रकारचा मजकूर असायचा. प्रत्येकाचा मथळा वेगवेगळ्या फाँट साईजमध्ये जुळवावा लागायचा. मध्येच चित्र असेल तर त्याचा शिशाचा ब्लॉक बनवून घ्यावा लागायचा. त्यासाठी त्या चित्राचा आकार आधीच ठरवावा लागायचा. नंतर तो बदलता येत नसे.
पानामध्ये कोणता मजकूर कुठे टाकायचा त्याची रचना कशी करायची यावर अनेक मर्यादा पडायच्या आणी हे सर्व सव्यापसव्य आटोपुन मुद्रणप्रत तयार झाली की मग ती चौकट छपाईयंत्रावर चढवुन छपाई करावी लागायची.
पण घरगुती वापराचे डेस्कटॉप संगणक आले आणि ही सर्व कामे एकाच टेबलावर बसून करता येऊ लागली. मजकूर पानामध्ये कसा दिसेल ते संगणकाच्या पडद्यावर दिसू लागले. त्यात हवे तसे बदल केवळ एकच कळ दाबून करता येऊ लागले. अनेक निरनिराळ्या घाटाचे, आकाराचे, सुबक फॉन्ट उपलब्ध झाले.
एखादा फाँट नाही आवडला तर एक कळ दाबून एका फटक्यात संपूर्ण पानाचा फॉंट बदलणे शक्य झाले. चित्रासाठी ब्लॉक बनविण्याचे दिव्य करावे लागणे बंद झाले. डिजिटल स्वरूपातले छायाचित्र थेट मजकुरामध्ये बसवता येऊ लागले. त्याचा आकार हवा तसा बदलणेही शक्य झाले. पानाची हवी तशी आकर्षक रचना करणे शक्य झाले. आणि हे करताना मुद्रित शोधनही आपोआप स्वयंचलितरित्या करता येऊ लागले.
किंबहुना संगणकच चुका कुठे आणि कोणत्या झाल्या आहेत हे दाखवून दुरुस्तीचे पर्याय सुचवू लागला. संपादनाच्या विविध सुविधाही प्राप्त झाल्या. एखाद्या लेखाची, पुस्तकाची, वर्तमानपत्राची अशी अंतिम मुद्रित प्रत केवळ एकाच जागी बसून तयार करण्याच्या या तंत्रज्ञानाला डेस्क टॉप पब्लिशिंग किंवा डीटीपी असे म्हणतात. ही मुद्रित प्रतही संगणकाच्या हार्डडिस्कवर किंवा एखाद्या छोट्याशा मेमरी स्टिकवर साठवूनही ठेवता येऊ लागली. म्हणजेच पुस्तकाची दुसरी, तिसरी आवृत्ती काढायची तर पुन्हा श्रीगणेशा करत सगळी खिळे जुळवणी करण्याची गरज उरली नाही.
छपाईच्या वेळेत तर बचत होऊ लागलीच पण अधिक सुबक छपाई करणे शक्य झाले. सुरुवातीला केवळ इंग्रजी भाषेत किंवा रोमन लिपीत उपलब्ध असलेली ही सुविधा आता इतर भाषांमध्येही उपलब्ध झाली आहे. याच पुस्तकाचा वापर विचार केल्यास लेखनापासून ते हे पुस्तक वाचकाच्या हातात येईपर्यंतची सगळी कामे केवळ संगणक वापरूनच केली गेलेली आहेत.
Comments are closed.