Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सत्ता गेल्यावर उद्धव ठाकरेंना महागाई, हिंदुत्वाची आठवण झाली; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची टीका

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई , दि. ७ ऑक्टोंबर : अडीच वर्षे सत्तेत असताना उद्धव ठाकरे यांना हिंदुत्व, महागाई यासारख्या मुद्द्यांचा विसर पडला होता. सत्ता गेल्यावर मात्र त्यांना हे मुद्दे आठवू लागले आहेत, अशी टीका केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी केली. भारतीय जनता प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

श्री.राणे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणांमुळे शिवसैनिकांना सामाजिक कार्याची, विधायक कामाची प्रेरणा मिळत असे. उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात मात्र शिव्या, शाप देण्याखेरीज काहीच केले नाही. हिंदुत्वाचा विश्वासघात करून मुख्यमंत्रीपद मिळवलेल्या उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वाटचालीत काहीही योगदान दिले नाही. एकनाथ शिंदे यांच्यासारख्या अनेक सामान्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या वाढीसाठी योगदान दिले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

२०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा वापर करून शिवसेनेचे उमेदवार निवडून आले. मात्र भारतीय जनता पार्टीला दगा देऊन मुख्यमंत्रीपद मिळवणाऱ्या उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली. मोदी सरकारने कोरोना काळात ८० कोटी जनतेला मोफत अन्न-धान्य दिले. त्यावेळी राज्यात सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी सामान्य माणसाला दमडीही दिली नाही. पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांवर टीका करण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी आपली पात्रता तपासावी असेही श्री.राणे म्हणाले.

श्री.राणे म्हणाले की, अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे हे मंत्रालयाकडे फिरकतही नसत. मुख्यमंत्रीपदाच्या काळात सामान्य माणसाच्या हिताचा एकही निर्णय ठाकरे सरकारने घेतला नाही. ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा वापर उद्धव ठाकरे करतात त्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे कामही उद्धव ठाकरे यांना पूर्ण करता आले नाही.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कोरोना काळात अनेक व्यवसाय तोट्यात गेले असताना शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाने मिळवलेल्या नफ्याची चौकशी करण्यासंदर्भात गौरी भिडे यांनी केलेल्या याचिकेचा उल्लेखही श्री.राणे यांनी केला. या याचिकेमुळे ‘कुणाची खोकी’ दैनिक सामना फायद्यात दाखवण्यासाठी वापरली गेली, हे उघड होईल असा टोलाही श्री.राणे यांनी लगावला.

हे देखील वाचा : 

स्मिता-जयदेव ठाकरेंवर कीर्ती फाटक यांचा हल्लाबोल

MPSC परिक्षेच्या दृष्टीने जिल्ह्यात 144 कलम लागू

 

Comments are closed.