लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क :- अवकाळी पावसाने केलेल्या शेतीच्या नुकसानीची झळ आता सामान्यांना बसू लागली आहे. अनेक राज्यांमध्ये तेलबियांच्या उत्पादनाला फटका बसला असून बाजारात खाद्य तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. सवर्सामान्य आणि गरिबांकडून स्वयंपाकासाठी पामतेलाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मात्र याच पामतेलाने शंभरी गाठल्याने ग्राहकांचे डोळे पांढरे झाले आहेत.
कांदा, बटाटा यांच्या दरवाढीने आधीच सामान्यांचे कंबरडे मोडले असला आता खाद्य तेलाची महागाई करोना संकटात सामान्यांचे घरगुती बजेट कोलमडून टाकणार आहे. केंद्रीय नागरी आणि अन्न पुरवठा मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सर्व प्रकारच्या खाद्य तेलाच्या किमतीत गेल्या वर्षाच्या तुलनेत सरासरी २० ते ३० टक्के वाढ झाली आहे. यात प्रामुख्याने पामतेल, सोयाबीन आणि सूर्यफुलाच्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. हे तेल मोठ्या प्रमाणात सामान्यांकडून दैनंदिन स्वयंपाकासाठी वापरले जाते.
केंद्रीय नागरी आणि अन्न पुरवठा मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार राई तेलाचा प्रती लीटर भाव सध्या १२० रुपये आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात तो १०० रुपयांच्या आसपास होता. वनस्पती तेलाचा भाव १०२.५ रुपये झाला आहे. गेल्या वर्षी तो ७५.२५ रुपये प्रती किलो होता. सोयाबीन तेल सध्या बाजारात ११० रुपये प्रती लीटर आहे. जे गेल्या वर्षी ९० रुपयांच्या आसपास होते. सनफ्लॉवर तेलाचा भाव १४० ते १५० रुपयांच्या आसपास असून गेल्या वर्षी तो ९५ ते ११० रुपये होता. शेंगदाणा तेलाचा भाव प्रती लीटर १८० ते १९० च्या दरम्यान आहे.
सध्या बाजारात पाम तेलाचा भाव एक लीटरसाठी १०९ ते ११० रुपयांच्या दरम्यान आहे. गेल्या वर्षी तो ७५ ते ८५ रुपयांच्या आसपास होता. या दरवाढीने खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे.
किरकोळ बाजारातील खाद्य तेलाचा एक लीटरचा भाव (१९ नोव्हेंबर २०२०)
शहर | शेंगदाणा तेल | राई तेल | वनस्पती तेल | सोयीबीन तेल | सनफ्लॉवर तेल | पाम तेल |
दिल्ली | १८४ | १५५ | ११६ | १२४ | १५० | ११० |
मुंबई | १८२ | १६२ | ११५ | ११५ | १३० | १०९ |
कोलकाता | १७० | १३७ | १०० | ११३ | १३५ | १०४ |
चेन्नई | १८७ | उपलब्ध नाही | १२६ | उपलब्ध नाही | १३५ | ११३ |
Comments are closed.