Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘आदिवासी महिलांनी तयार केलेल्या आकाश कंदिलांनी राजभवन उजळणार’

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

पालघर, दि. १२ नोव्हेंबर: या दिवाळीत राज्यपालांचे निवासस्थान असलेला राजभवन परिसर पालघर जिल्ह्यातील आदिवासी महिलांनी तयार केलेल्या आकाश कंदिलांनी उजळणार आहे.

स्थानिक स्वदेशी उत्पादनांना मदत करण्याच्या हेतूने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राजभवनातील सर्व कर्मचाऱ्यांना दीपावलीनिमित्त मिठाईसह आदिवासी महिलांनी तयार केलेले व बांबूपासून तयार केलेले पर्यावरण-स्नेही आकाश कंदील भेट दिले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

“राजभवनात राज्यपाल येत असतात व जात असतात परंतु येथील स्थायी कर्मचारी मात्र येथेच राहत असतात. त्यामुळे राजभवन सुंदर व स्वच्छ ठेवण्याची तसेच चांगली शासकीय सेवा करण्याची जबाबदारी सर्वांची आहे”, असे राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना सांगितले.

या वर्षी फेब्रुवारी महिन्यात राज्यपालांनी पालघर जिल्ह्यातील भालिवली येथील विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटरच्या बांबू प्रकल्पाला भेट दिली होती. त्या ठिकाणी बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या आदिवासी महिलांना त्यांनी प्रमाणपत्रे दिली होती. अधिकाधिक लोकांनी आदिवासी बांधवांनी तयार केलेली उत्पादने विकत घ्यावी अशी सूचना करताना आपण राजभवनापासून याची सुरुवात करू असे कोश्यारी यांनी सांगितले होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

त्यानुसार राज्यपालांनी विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटरला आकाश कंदील पुरविण्याचे सूचित केले. केंद्राच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील भालिवली, बोट, दुर्वेश व गोजे येथील आदिवासी महिलांनी ही कंदील तयार करून राजभवन येथे पाठविले व आज राज्यपालांनी आपल्या कर्मचारी व पोलीस जवानांना ते दिवाळीनिमित्त भेट दिले.  करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दिवाळी सुरक्षित, पर्यावरणपूरक व प्रदुषणरहित साजरी करावी अशी सूचना राज्यपालांनी केली. यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, विशेष सचिव राकेश नैथानी, उपसचिव प्राची जांभेकर तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Comments are closed.