Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

इनहेलर: दम्यावरील प्रभावी उपचार.

डॉ. अशोक अरबट

ज्येष्ठ श्‍वसनरोग तज्ज्ञ, नागपूर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दम्याचे व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगाने गेल्या भागात आपण प्रतिबंधात्मक उपाय बघितले. प्रतिबंधात्मक उपया करण्यासोबतच औषधोपचार आणि अन्य उपचार पद्धतींचा अवलंब करणे देखील क्रमप्राप्त आहे. जेव्हा़ दम्याचे निदान होते, तेव्हा डॉक्टर सर्वप्रथम औषध लिहून देतात. अर्थात औषध ही प्रभावी असतात. मात्र, त्याहून प्रभावी अशी उपचार पद्धती म्हणजे इनहेलर थेरपी. तुम्ही सिनेमांमध्ये एखाद्या पात्राला दम लागल्यावर खिशातून कुठलीतरी डब्बी काढून ती तोंडासमोर धरतो, हे बघितले असेल. काही वेळाने मग त्याला बरं वाटू लागतं. ती डब्बी म्हणजे दुसर तिसर काही नसून इनहेलर आहे.

जसं की, डोळ्याचे आजार झाले तर आपण डोळ्यात औषध घालतो, कानांचा आजार झाला तर कानात औषध घालतो. इनहेलर अगदी त्याच प्रकारे कार्य करते. फुफ्फुसांचा आजार झाला म्हणून थेट फुफ्फुसांपर्यंत औषध पोहचविण्याचे कार्य या इनहेलरद्वारे होत असते. गेल्या वीस पंचविस वर्षांपासून इनहेलर थेरपी ही दम्याच्या व्यवस्थापनासाठी आणि उपचारासाठी अत्यंत प्रभावी ठरत आहे. ही उपचारपद्धती प्रभावी ठरण्याचे एक कारण असे की, औषधे पोटात गेल्यावर रक्ताद्वारे ती फुफ्फुसातील प्रभावीत भागांपर्यंत पोहचण्यास वेळ लागतो. मात्र, इनहेलरद्वारे औषधे थेट प्रभावित भागांपर्यंत पोहचून त्वरीत म्हणजे अगदी मिनितांच्या आत उपचार होतो. दुसरं असं की, औषधांच्या तुलनेत इनहेलरमधील औषधांचे घटक दहा ते शंभर पटीने फार कमी असतात. त्यामुळे जेवढी आवश्यकता आहे, तेवढेच औषध घेतल्या जाते व औषधांपासून दुष्परिणाम होत नाही.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अमेरिकेपासून ते आफ्रिकेपर्यंत आणि अगदी आशियातही दम्यावर इनहेलर अत्यंत प्रभावी, लवकर आराम मिळवून देणारी, कमी दुष्परिणामांसह फुफ्फुसांना सक्षम करीत आहे.  इनहेलरचे देखील दोन प्रकार आहेत. एक म्हणजे रेस्न्यु इनहेलर. जर दम्याचा त्रास अचानक वाढला तर हे रेस्न्यु इनहेलर आवश्यक असते. त्यामुळे तात्काळ आराम होतो, तात्काळ आराम होतो व दम कमी होतो. दुसरं इनहेलर  ‘अ‍ॅन्टिइफ्लेमेटरी इनहेलर’ असते.  यात स्टिरॉईड नामक औषध अत्यंत कमी प्रमाणात असते. हे इनहेलर दम्याच्या दीर्घकालीन उपचारांवर प्रभावी ठरते. यास स्टिरॉईड इनहेलर असेही म्हणतात.

इनहेलर घेण्याच्या पद्धतीचेही अनेक प्रकार आहेत, जसे रोटाहेलर, मीटर डोज इनहेलर वगैरे. ते रुग्णाच्या दम्याच्या तीव्रतेच्या अनुषंगाने डॉक्टर सुचवित असतात. या उपचारांसोबत डॉक्टर इतर औषधेही लिहून देतात. त्या गोळ्याही नियमित घेणे गरजेचे असते. जेव्हा दमा फार वाढतो अथवा दम्याचा अटॅक येतो तेव्हा छातीत भरून येते, घाम फुटणे, हृदयाची स्पंदने वाढणे, चक्करही येणे आणि श्‍वास घेण्यास त्रास होणे,  शरीरातील ऑक्सिजनची मात्रा कमी होणे, अशी लक्षणे आढळतात. हे किंबहुना जीवघेणे देखील ठरू शकते. अशा वेळी न्युबलायजरद्वारे दम्याच्या औषधांची वाफ दबाव करून दिल्या जाते. जर त्याने आराम पडत नसेल तर इस्पितळात भरती होणे हितावह असते.

दमा नियंत्रित राहिला तर फुफ्फुसांचे क्रियान्वयन सुरळीत राहते. जर फुफ्फुसांचे क्रियान्वयन सुरळीत राहिले तर त्याचा हृदयावर परिणाम होत नाही. अनियंत्रित दम्यामुळे व्यक्तीची कार्यक्षमता कमी होते, ताकदही कमी होते आणि शरीरावर विपरित परिणाम होऊ शकतात. हृदयाच्या उजव्या भागावर परिणाम होऊन अंगावर सुज येऊ शकते. वैद्यकीय गुंतागूंत टाळायची असेल, स्वतःला स्वस्थ ठेवायचे असेल तर नियमित औषधोपचारासह, व्यायाम आणि प्रतिबंधात्मक उपायांची सांगड घातली पाहिजे. मग सामान्य जीवन जगण्यात अडचण येणार नाही.

Comments are closed.