Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

लेकरांनो तुम्ही टेक्नोसॅव्ही झालात…..पण म्हणून आईबापाला वेड्यात काढू नका ना !!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

धनंजय देशपांडे

एका मित्राच्या घरी गेलेलो असताना अनुभवलेली हि सत्यकथा. मित्र माझ्याच वयाचा. स्वावलंबी शिकत शिकत पुण्यात स्थिर झालेला. पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असं चौकोनी कुटुंब. स्वतःचा फ्लॅट, सेकंड हॅन्ड का असेना पण एक कार, दोन्ही मुलांना स्वतंत्र टू व्हीलर. पत्नी हाऊसवाईफ. गृहकृत्यदक्ष, आतिथ्यशील. वैनीच्या हातचे जेवण म्हणजे आत्मा तृप्त !
“अरे किती दिवस झाले, घरी आला नाहीये. बायको विचारत होती, पिठलं भाकरीला कधी येणार? येतो का आज? ” असा धाडकन फोन करून मित्राने बोलावलेलं. तर अशा घरी एकदा गेलेलो.
गेल्यावर त्याची दोन्ही मुलं पण भेटली. “हाय काका, कसे आहात” वगैरे झाल्यावर ते दोघेही पलीकडच्या सोफ्यावर मोबाईलमध्ये तोंड खुपसून बसले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मीही मित्रांसोबत गप्पामध्ये रमलो. वैनी पण चहा बिस्कीट घेऊन जॉईन झाल्या.
इतक्यात मित्र त्याच्या मोबाईलमधून फोटो दाखवण्यासाठी माझ्याजवळ आला. पण काय गडबड झाली काय माहित. त्याचे ते फोटो फोल्डर नीट ओपनच होईना. जणू हँग झालेलं. दोनचारदा ट्राय झाला तरी मोबाईल ढिम्म ! मग त्याने मुलाला हाक मारून “अरे हे काय झाल पहा?” सांगितलं. मुलाने तो मोबाईल घेऊन रिबूट करून पुन्हा हातात दिला. आता फोटो फोल्डर ओपन झाले होते. पण मुलगा जात जात बाबाला म्हणाला, “अति घाईत असं होत असत. सेकंदभर थांबत का नाही तुम्ही? सांगितलं होत आधीच मी हे. पण तुम्हाला सगळी घाईच असते”
यावर तिकडे बसलेल्या मुलीनेही सुरात सूर मिसळत “हो रे दादा, परवा पण त्यांनी असेच केले. मग मीच ते नीट करून दिल” असं बोलून गेली.इकडे मित्राला कदाचित असं ऐकण्याची सवय असावी पण वैनीचा चेहरा उतरला. कारण दुसऱ्या कुणासमोर तरी किमान मुलांनी असं वागू नये. असं तिला वाटण स्वाभाविक.

मी शांत होतो पण मनात कोलाहल दाटलेला. म्हटलं आता याकडे दुर्लक्ष करून आपण आपलं जेवून निघणं सोपं. पण दुसरं मन सांगत होत की जे घडतंय ते चूक आहे न? मग बोललं पाहिजे. शेवटी मनाचा कौल मानला अन त्या दोन्ही मुलांना हाक मारून समोर घेतलं.
“अरे मुलांनो. पाचच मिनिट तुमची घेतो. जास्त बोअर करणार नाही. तुमच्या पिढीला आमचं बोलणं म्हणजे ‘सेंटी” किंवा “लेक्चर” वाटत. तेही करणार नाही. पण तरी थोड्या गप्पा मारायच्या आहेत.”

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

असं म्ह्टल्यावर मुलांनी मोबाईल बाजूला ठेवून ऍक्सेप्टन्स मोड दाखवला. इथेच निम्मे काम झाले होते. मग त्यांना जे सांगितलं तेच इथं आता सगळ्यांना पोस्ट मधून सांगतोय. तर गंमत म्हणजे पाच मिनिट मागून घेतलेली अन पाचव्या मिनिटाला “झालं माझं” असं म्हटलं तर मुलगी स्वतः म्हणाली, “बोला हो काका, वेगळं आहे हे काहीतरी.”

मग मीही अजून पंधरा वीस मिनिट घेतली. अन शेवटी थांबलो. नंतर काय झालं काय माहित पण तो मुलगा पटकन उठला अन त्याच्या बाबाच्या जवळ जाऊन हळू आवाजात “सॉरी” म्हणाला. हे पाहून आईच्या डोळ्यात गहिवर. मुलगी पण निशब्द झालेली.मग मीच एक हलकाफुलका जोक सांगून सगळ्यांना रिलॅक्स केलं अन सगळे मिळून मग जेवायला बसलो.

तर त्या मुलांना काय सांगितलं ? तर हेच की, मान्य आहे, आमची पिढी तांत्रिक बाबतीत थोडी अडाणी आहे. पण एक लक्षात घ्या की, आमच्या आयुष्यात साधा लँडलाईन फोन सुद्धा तिसाव्या वर्षी आलेला. रिसिव्हर कसा ठेवावा हेही आधी कळत नसायचं. त्यातून इथवर आम्ही आलो. अन तुम्ही नर्सरीच्या वयात असतानाच मोबाईल सोबत वाढलात. त्यामुळे सतत वापरल्याने जसे तुम्ही त्यात पारंगत होता तसे आम्ही उशिरा होणार न? बरे, मोबाइलमधले सगळे आले म्हणजे तुम्ही आई बापापेक्षा मोठे नाही न होऊ शकत. कारण मोबाईल काही तुमचा बुध्यांक सांगत नाही किंवा कर्तृत्व दाखवत नाही. जे उलट हे सगळं काहीही नसताना आईबापांनी मिळवलं आहे. गुगल नसतानाही आम्ही परीक्षा चांगल्या मार्काने पास झालोय. हे लक्षात घ्या. टेक्नोसॅव्ही असणे आजच्या काळाची गरज आहेच. पण ते म्हणजेच सगळं नाही न ? नकळत आपण त्या नादात त्या लोंकाना दुखावतोय ज्यांच्यामुळे उलट तुम्हाला हे जग पाहायला मिळालं. हे पहा. भले आईला मोबाईलवरून सिनेमाची तिकीट बुक करता येत नसतील पण तिच्या नवऱ्याने व्यवस्थित कमावले म्हणून तर तुम्ही त्यांच्याच पैशातून तिकिटे बुक करता न? मग अशा कारकुनी कामाला तुम्ही हुशारी कशी समजता? आमच्या पिढीला उभं राहण्यातच इतकी वर्ष गेली आता कुठे थोडा वेळ मिळतो तेव्हा आम्ही मोबाईलवर थोडं येतो. तुमच्या वापरात अन आमच्या वापरात वेळेचा फरक आहे न ? तुमच्यासारखं आम्हालाही हे आधी मिळालं असत तर आम्हीपण ते ते सगळं केलं असतंच की जे तुम्ही करता!!

मोबाईल मीन्स सोशल मीडियाचे ज्ञान किती उपयोगी? हा विचार तुम्ही करणार कधी? व्हाट्सअप तर सकाळी काशी वाराणसी असत, दुपारी गोवा अंदमान तर रात्री थेट बँकॉक होते. त्यातून काय वेगळं ज्ञान मिळत? त्यापेक्षा पहा, आम्ही आजही हक्काने आमच्या मित्रांना घरी जेवायला बोलावतो. गप्पा मारतो. त्या तास दोन तासात आमचं लक्ष पण मोबाईलकडे जात नाही. अन तुम्हाला तर मोबाईल टॉयलेटमध्ये लागतो त्याशिवाय “होतच” नाही. मग ऍडिक्ट कोण? विचार करा लेकरानो.

असू द्या आईबाप नॉन टेक्निकल, असू द्या अडाणी. पण ज्या मोबाईलवरून तुम्ही सगळं करता तो मोबाईल आईबापाच्याच पैशातून आलाय न? हे विसरू नका. डीडी क्लास : स्वकौशल्याने पुढच्या पिढीने नक्की आभाळाला गवसणी घालावी. पण हे करताना ज्याने जमीन सोडली, त्याला आभाळ पण जवळ करत नाही. हेच सत्य आहे. मग तोंडावर नंतर कधीतरी आपटून याच जमिनीची माती तुमच्या नाकातोंडात जाणार. हे सगळं टाळणं आताच हाती आहे. मागच्या पिढीला जपा मग पहा तुमचं जगणं किती सुखदायी होते ते ! कारण आईबाप फक्त आणि फक्त मुलासाठीच कष्टत असतात. जगत असतात. रे !!

Comments are closed.