Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कॅन्सर मुक्त भारतासाठी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट-एनसीआय ही संस्था म्हणत्वाची भूमिका बजावेल- केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

नागपूरातील जामठा येथे नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे लोकार्पण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

नागपूर, दि. २७ एप्रिल : संशोधनाच्या जोरावरच आपण कॅन्सर सारख्या रोगाला रोखू शकतो. कॅन्सर मुक्त भारतासाठी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट-एनसीआय ही संस्था महत्वाची भूमिका बजावेल असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले.

नागपूरातील आऊटर रोड जामठा येथे डॉ.आबाजी थत्ते सेवा आणि संशोधन संस्थेद्वारे स्थापित नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट- एनसीआयच्या लोकार्पण सोहळ्याला ते संबोधित करत होते. याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामुख्याने उपस्थित होते. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या मुख्य इमारतीमध्ये यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट या संस्थेतून कॅन्सर विषयी प्रतिबंधात्मक उपचार त्याचप्रमाणे निदान होईल. जागतिक स्तरावरील अद्यावत तंत्रज्ञानासोबत जॉईंट वेंचर करून या संशोधनाद्वारे कॅन्सरच्या उपचारांमध्ये आपल्याला मदत होईल असे प्रयत्न करायला हवे असे आवाहन गडकरी यांनी यावेळी केले.

या संस्थेत थॅलेसेमिया आणि सिकलसेल वर अधिक संशोधन आणि उपचार यासाठी प्रयत्न केले जाणार आहे ही दिलासादायक बाब असून पूर्व विदर्भातील या आजाराच्या रुग्णांना याचा लाभ होईल असेही त्यांनी सांगितले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कार्यकाळात नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाची भेट सर्वसामान्य नागरिकांना दिली त्याच धर्तीवर एनसीआयची सुद्धा सुविधा आता सामान्य नागरिकांना मिळाली आहे त्याबद्दल त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयाच्या बांधकामाची प्रशंसा केली. येथील जनरल वार्ड सुद्धा एखाद्या पंचतारांकित हॉटेल सारखा असून येथे सर्व सुविधा उपलब्ध आहेत असे त्यांनी सांगितले. कॅन्सरसारख्या आजारावर गुणवत्तापूर्ण उपचार उपलब्ध करून देणे हे एक आव्हान असून या सुविधा किफायतशीरपणे उपलब्ध करून देण्यास शासन प्रयत्नशील आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजना, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता योजना या योजनांद्वारे सर्वसामान्यांना आधार दिला जात आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कर्करोगासारखा आजार जडल्यास आयुष्यभराची पुंजी द्यावी लागते परंतु एनसीआय सारख्या संस्थेत किफायतशीर दरात हा उपचार उपलब्ध असून त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळेल. अशा हजारो कर्करोग रुग्णांसाठी एनसीआय मधील डॉक्टर्स आणि नर्सेस देवदूत म्हणून काम करतील, अशी आशा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

मुंबईमध्ये टाटा कॅन्सर रुग्णालयात रुग्णांचे सोय होत होते परंतु या रुग्णालयावर प्रचंड असा ताण पडत होता. मध्य भारतातील कर्करोग रुग्णांची सोय व्हावी यासाठी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटची स्थापना केली असून यामध्ये बालकांसाठी ‘पेडियाट्रीक वॉर्ड’ मध्ये नि:शुल्क उपचार केले जात आहेत. येथे भरती होणारे बालक पुर्णपणे बरे होऊन जातात. कॅन्सरच्या उपचार क्षेत्रातील प्रोटोन बिम, कार्बन आयन थेरेपी सारख्या अत्याधुनिक यंत्रणा किफायतशीर दरात एनसीआय मध्ये उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. देशाच्या विविध भागातून येणा-या रुग्णांच्या नातेवाईकांच्या राहण्यासाठी धर्मशाळा सुद्धा या ठिकाणी उभारली जाईल. थॅलसेमिया, सिकलसेल या रक्तासंदर्भातील आजारावर देखील येथे संशोधन होणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
ज्या सेवाभावाच्या वृत्तीने एनसीआय निर्माण केले गेले त्याच वृत्तीने ही संस्था , हे हॉस्पिटल पुढे सुद्धा अग्रेसर होत राहील.यासाठी समाजातर्फे सुद्धा प्रयत्न झाला पाहिजे .काही लोकांच्या सहयोगामुळे , त्यांच्या सांघिक कार्यामुळे एनसीआय सारखी इमारत उभी राहली. या प्रकल्पाला सगळ्यांची सतत सहयोगी म्हणून सहकार्य सुद्धा आवश्यक आहे .या सहकार्यामुळेच कॅन्सर सारख्या संकटाला न घाबरता, न डगमगता आपण ठामपणे उभे राहून प्रतिकार करू तेव्हाच कॅन्सर सारख्या आजाराबद्दलची भीती लोकांमधून नाहीशी होईल. याच भावनेने नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटची स्थापना करण्यात आल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी यावेळी केले.

याप्रसंगी एनसीआयच्या उभारणीत सहकार्य करणाऱ्या विविध कंपन्या, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम यांचे देखील आभार आयोजकांतर्फे मानण्यात आले. मान्यवरांनी रुग्णालायचा दौरा यावेळी केला. तेथील पदाधिका-यांनी रुग्णालायतील सेवा सुविधांची माहिती दिली. याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, एनसीआयचे अध्यक्ष एडवोकेट सुनील मनोहर, उपाध्यक्ष माजी राज्यसभा खासदार अजय संचेती, संस्थेचे महासचिव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश जोगळेकर, कोषाध्यक्ष आनंद औरंगाबादकर, संस्थेचे वैद्यकीय संचालक डॉक्टर आनंद पाठक, एनसीआयचे पदाधिकारी ,कर्मचारी उपस्थित होते.

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट नागपूर विषयी :

डॉ.आबाजी थत्ते सेवा आणि संशोधन संस्था द्वारे स्थापित नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट या कर्करोगाच्या इस्पितळाचा लोकार्पण समारंभ आज झाला. 470 खाटांची क्षमता असणारे हे 25 एकर वर पसरलेले हॉस्पिटल प्रामुख्याने कर्करोगावर उपचारासाठी असून या स्वयंसेवी संस्थेद्वारे हे हॉस्पिटल चालवले जात आहे. 28 फेब्रुवारी 2015 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या संस्थेचे भूमिपुजन करण्यात आले. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन हे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या हस्ते 2017 मध्ये नागपुरातच करण्यात आलं होतं. याप्रसंगी एनसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश जोगळेकर यांनी या इमारतीच्या विषयी माहिती देताना सांगितलं की ही इमारत दहा मजली असून 7.5 लाख स्क्वेअर फुट एरियावर पसरलेली आहे. यामध्ये विविध विभाग असून कर्करोगाच्या उपचाराकरीता सर्व सुविधा एकाच छताखाली येथे उपलब्ध आहेत.

हे देखील वाचा : 

2 मे रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

जिल्ह्यात 144 कलम लागू

 

 

Comments are closed.