Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अनुसूचित क्षेत्रातील शासकीय दमन तात्काळ थांबवा : भामरागड तालुक्यातील नागरिकांची मागणी

धोडराज पोलीस मदत केंद्रासमोर रस्त्यावरच मांडला बेमुदत ठिय्या.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

भामरागड, दि. २३ फेब्रुवारी : गडचिरोली जिल्हा हा भारतीय संविधानाच्या कलम २४४ (१) व पाचव्या अनुसुचि अंतर्गत अनुसूचित क्षेत्र म्हणून घोषित केलेला असून या क्षेत्रातील शांतता व सुव्यवस्था नांदण्याकरीता तरतूदी केलेल्या असतांना सुध्दा शासकिय व्यवस्थेव्दारा या क्षेत्रातील शांतता व सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न वारंवार होत असून अनुसुचित जमातीच्या नागरिकांच्या मानवाधिकारांचे हनन करण्यात येत आहे. त्यामुळे न्याय मिळविण्यासाठी हजारो आदिवासी महिला व नागरिकांनी आजपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केले.

वाहने जाळपोळ प्रकरणात अटक केलेल्या राकेश महाका, सोमजी महाका, सुभाष महाका, मासु महाका, दालसु महाका, राजु मिचा, रामजी पुंगाटी, प्रकाश पुसु विडपी यांना खोटे गुन्हे दाखल करुन अटक करण्यात आलेली असून प्रकाश पुसु विडपी हा विद्यार्थी असतांना सुध्दा त्याला या प्रकरणात गुंतविण्यात आले आहे. प्रकाश विडपी हा परीक्षा देण्यासाठी महाविद्यालयात उपस्थित होता. सदर नागरीकांना बिनशर्तपणे तात्काळ त्यांच्यावरील गुन्हे रद्द करुन मुक्त करण्यात यावेत या प्रमुख मागणीसाठी हा ठिय्या आंदोलन जि.प. सदस्य ॲड.लालसू नरोटे, पं.स.सभापती गोई कोडापे, प.स.सदस्य प्रेमीला कुड्यामी, कोठीच्या सरपंच भाग्यश्री लेखामी, राजू मडकामी यांच्या नेतृत्वात हे ठिय्या आंदोलन आज बेमुदत कालावधीसाठी सुरू केले असून नेलगुंडा परिसरातील आदिवासी महिला मोठ्या प्रमाणात सहभाग झाल्या आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली जिल्ह्यातील आतापर्यंत हजारो आदिवासी नागरिकांना शासनाने विविध गुन्हे लावून तुरुंगात धाडले आहे, त्यापैकी शेकडो निरपराध आदिवासींना नक्षल असल्याचे सांगून मारुन टाकण्यात आलेले आहे. इंग्रजांच्या राजवटीतसुध्दा गडचिरोली जिल्ह्यात आदिवासींची जेवढी हत्या झाली नसेल तेवढी हत्या मागिल ४० वर्षात आदिवासी नागरिक नक्षलवादी असल्याचा आरोप करुन त्यांना सरकारने मारुन टाकलेले आहे. चिन्ना मटामी, एडका मासा आत्राम, राजकुमार खेसे, प्रकाश मुहांदा असे अनेक लोकांची पोलीसानी हत्या केली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

एटापल्ली तालुक्यातील गटेपल्ली येथील ५ युवती ३ युवकांचीही पोलिसांनी हत्या केली. याबाबत जनतेने अनेक आंदोलन, मोर्चा, निवेदने देण्यात आले. तरी आजपर्यंत दोषीवर कुठल्याही प्रकारचे कार्यवाही केली नाही. शासनाच्या वतीने संबंधित कुटुंबाला साधे पत्रही पाठवले नाही. याबाबतीत शासन पूर्णपणे निद्रावस्थेत असून या देशातील आदिवासी व स्थानिक अन्य समुदायाला नामशेष करण्याची भूमिका घेतली आहे.असा आरोप आंदोलकांनी केला असून अनुसूचित क्षेत्रामध्ये सरकारच्या वतीने गोळीबार करुन आदिवासी नागरिकांना ठार मारण्याचा उपक्रम कायम स्वरुपी बंद करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय, पोलीस विभागाच्या वतीने जन मैत्री मेळावाच्या नावाने जनतेला त्रास देण्याचा बेकायदेशीर व असंविधानिक कृत्य विनाविलंब व तात्काळ बंद व्हावा. अनुसूचि क्षेत्रातील वनसंपदा व खनिजांची लुट करण्याकरीता बेकायदेशिरपणे खदानी प्रास्तावित करण्यात आलेल्या असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड़ करून, जनतेची मागणी नसतांनाही राष्ट्रीय महामार्ग व इतर रस्त्यांचे बळजबरीपणाने शासनाच्या वतीने करण्यात येत असलेले रस्ते बांधकाम तात्काळ थांबविण्यात यावे. लोकसंख्या विरळ असतांना सुध्दा नियमात बसत नसतांना शासनाच्या वतीने ५ ते १० किलोमिटरच्या परिसरामध्ये पोलिस मदत केंद्र , पोलिस स्टेशन उभारले जात आहे.

यामुळे अनुसुचित क्षेत्रातील शांतता भंग होत असून खनिज संपत्ती व वनसंपदेची भांडवलदारांना खुली लुट करु देण्याचा सरकारचा हेतू असून सदर प्रकाराचा अनुसूचि क्षेत्रातील जनतेने वेळोवेळी विरोध केला असून या क्षेत्रामध्ये बळजबरी उभारलेले पोलिस मदत केंद्र, पोलिस स्टेशन, सिआरपीएफ कॅम्प तात्काळ रद्द करण्यात यावे व यापुढे ग्रामसभेच्या सहमतीशिवाय कोणतेही पोलिस मदत केंद्र, पोलिस स्टेशन, सिआरपीएफ कॅम्प याला शासनाकडून मंजूरी देण्यात येऊ नये तसेच गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागडसह मंजूर व प्रास्तावित असलेल्या संपुर्ण २५ लोह खदानींचे काम तात्काळ थांबवून त्या कायमस्वरुपी रद्द करण्यात याव्यात यांसारख्या मागण्यांचा यात समावेश आहे.

दरम्यान सदर मुद्यांची सोडवणूक सरकारच्या वतीने जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पोलिस मदत केंद्र धोडराज च्या समोर संविधानिक हक्क आणि अधिकारासाठी हे ठिय्या आंदोलन बेमुदत कालावधीसाठी सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी जाहीर केलेला आहे.

हे देखील वाचा : 

नवाब मलिकांचा मंत्रिपदाचा राजीनामा न घेण्याचा शरद पवारांचा मोठा निर्णय; नवाब मलिकांच्या पाठिशी राष्ट्रवादी ठाम

जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांना जीप.पंस असोसिएशनतर्फे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर!

केंद्रीय राखीव पोलीस बल  क्रमांक ३७ वाहिनीद्वारे सिविक एक्शन कार्यक्रमाअंतर्गत अतिदुर्गम भागात विविध जीवनावश्यक वस्तुंचे वाटप.

 

 

Comments are closed.