Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘आरपार’ आत्मचरित्र वाचून दु:खाला पार करून ध्येयाचा सार गाठता येईल – गोविंद नांदेडे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नांदेड, दि. ३ नोव्हेंबर :  आजही आपल्या देशामध्ये ३५ टक्के मुली या शाळेबाहेर आहेत. या मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी, त्याचबरोबर देशातील आया-बायांना संकटावर कशी मात करावी याची शिकवण देऊन आपल्या मुलींना उत्तमपणे कसं शिकवावं, याची प्रेरणा देणारं, महिलांच्या, मुलींच्या जीवनात प्रबोधनाची पहाट आणणारं ‘आरपार’ हे आत्मचरित्र आहे. या आत्मचरित्रामुळे दुःखाला पार करून ध्येयाचा सार गाठता येऊ शकेल, अशा आशावाद राज्याचे पूर्व शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे यांनी व्यक्त केला.

निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी कमल कदम यांनी लिहिलेल्या व स्वयंदीप प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या ‘आरपार’ या आत्मचरित्राचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक देविदास फुलारी, जेष्ठ विचारवंत डॉ. अनंत राऊत,साहित्यिक डॉ. राम वाघमारे,यशदा पुणे येथील अधिकारी डॉ.बबन जोगदंड, कल्याणकर क्लासेसचे संचालक नागेश कल्याणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी पुढे बोलताना डॉ. नांदेडे म्हणाले,कमल कदम यांनी आपल्या जीवनामध्ये मोठं दुःख भोगलं ; परंतु त्या दुःखाला न घाबरता दुःखाच्या माथ्यावर पाय देऊन पुढे त्यांनी वाटचाल केली. त्यांनी भोगलेलं जीवन व त्यांना आलेले कौटुंबिक अनुभव या आत्मचरित्रात शब्दबद्ध केले आहेत. या आत्मचरित्रामुळे शिक्षिका,समाजातील वंचित, उपेक्षित घटकांना कठीण प्रसंगातून कसे जायचे याबाबत मार्गदर्शन मिळू शकेल.

या आत्मचरित्रात स्त्रियांच्या सन्मानाचे प्रतिबिंब उमटले आहे, त्यामुळे या आत्मचरित्रातून मुलींना नवी प्रेरणा, नवी दिशा सापडू शकेल. या आत्मचरित्रात विद्रोह नसला तरी बुद्धांचा मध्यममार्ग असल्याचेही ते शेवटी म्हणाले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी आपल्या प्रास्ताविकात यशदा पुणे येथील अधिकारी डॉ. बबन जोगदंड यांनी हे आत्मचरित्र मराठी साहित्यात मोलाची भर घालणारे असून यातील प्रसंग हे प्रत्येकाला आपलेच वाटावे असेच आहेत. लेखिकेच्या वाट्याला प्रचंड दुःख,वेदना, अपमान, अवहेलना, अगतिकता आलेली असतानाही त्यातून तावून-सुलाखून निघून त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. त्यामुळे हे आत्मचरित्र सर्वांसाठी दीपस्तंभ ठरेल.

यावेळी साहित्यिक डॉ.राम वाघमारे यांनी कमल कदम या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रभावित झालेल्या लेखिका असून त्यांनी जीवनामध्ये प्रचंड संघर्ष केला आहे. पुरुषप्रधान संस्कृतीतही त्यांनी आपले अस्तित्व टिकवून आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. असे सांगितले.

प्रसिद्ध विचारवंत डॉ. अनंत राऊत यांनी या आत्मचरित्रावर सविस्तर प्रकाश टाकला. दलित आत्मकथने चिकित्सक, विज्ञानवादी,समतावादी असून त्यानी मराठी साहित्यावर आपला एक वेगळा प्रभाव टाकला आहे. आपले दुःख वेशीवर टांगणारे, पाप-पुण्य, दैव,नशीब या संकल्पनांना छेद देऊन समतावादी, विज्ञानवादी सिद्धांत कथन करायला शिकवणारी ही चरित्रे आहेत.

दलित आत्मकथनांना ‘स्वकथन’म्हटले पाहिजे, अशी भूमिका अलीकडच्या काळामध्ये अनेक जण घेत आहेत आणि ती न्याय आहे असेही ते म्हणाले.

कदम यांनी स्वतःचा खडतर जीवनप्रवास या आत्मचरित्रात प्रांजळपणे मांडला असून त्यांच्या लेखनात प्रामाणिकपणा दिसून येतो, हे या आत्मचरित्राचे वैशिष्ट्य आहे. आपले जीवन समाजापुढे मांडणं म्हणजे आत्मकथन होय, असेही ते शेवटी म्हणाले.

यावेळी साहित्यिक देवीदास फुलारी यांनी हे आत्मचरित्र सगळ्या वादांच्या पलीकडे असून लेखिकेने स्वच्छ, पारदर्शी, सटीकपणे आपली जीवनगाथा या आत्मचरित्राच्या माध्यमातून मांडली आहे.
या आत्मचरित्राची शैली सहज, सुंदर व सोपी आहे व हे आत्मकथन बुद्धांच्या विचारांना स्पर्श करणारे असल्याने हे आत्मचरित्र मराठी साहित्यात मैलाचा दगड ठरेल असे सांगितले. यावेळी नागेश कल्याणकर यांनीही या साहित्य कृतीबद्दल लेखिकेचे कौतुक केले.

प्रारंभी आत्मचरित्राच्या लेखिका कमल कदम यांनी थोडक्यात आपल्या या चरित्राबद्दल माहिती देऊन हे आत्मचरित्र म्हणजे संघर्षाची कहाणी आहे. संघर्षावर मात कशी करायची याचा वस्तुपाठ आहे,असे सांगितले.
चित्रा जोंधळे यांनी स्वागतगीत गायले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. देविदास तारू यांनी केले तर आभार गणेश शिंदे यांनी मानले. या कार्यक्रमाला डॉ. व्यंकटेश काब्दे, महेश मोरे, इंदिरा चव्हाण,पी. जी.शिरपूरकर,सोनू दरेगावकर, डॉ.विलास ढवळे,मिलिंद ढवळे,डॉ.विकास कदम,सी. आर.पंडित,बाबुराव पाईकराव, दिगंबर कदम,डॉ माधव बसवंते, भीमराव हटकर, गंगाधर ढवळे,गजानन पाम्पटवर, भदंत पैया बोधी, तुकाराम ढवळे, डॉ. बि-हाडे, सिद्धार्थ लोखंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

हे देखील वाचा :

‘जय भीम’ चित्रपटातील दृश्यावरुन वाद

डिझेल १० रुपयांनी तर पेट्रोल ५ रुपयांनी स्वस्त

तब्बल १३ लाख किंमतीचा मुद्देमाल केला लंपास ! दिवाळी आधी गिफ्टच्या दुकानात चोरी !

 

Comments are closed.