Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नक्षलग्रस्त भागात गडचिरोली पोलीस दलाचे कार्य कौतुकास्पद – गृहराज्यमंत्री, शंभूराज देसाई

दादालोरा खिडीकी उपक्रमाची ग्यारापत्ती येथे जावून प्रत्यक्ष केली पाहणी. गडचिरोली येथील दादालोरा महामेवाळ्यात त्यांचे हस्ते प्रमाणपत्र व साहित्याचे वाटप.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. २७ जानेवारी : गडचिरोली जिल्हयातील नक्षलग्रस्त भागात शासनाच्या योजना पोहचविण्यासाठी पोलीस विभागाने अनेक उपक्रम राबवून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उत्कृष्ठ कार्य केले आहे. यामुळेच आता स्थानिक नागरिकांनी नक्षल विचारसारणी झुगारून त्यांना स्विकारलं असल्याचे मत राज्याचे गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी गडचिरोली येथे व्यक्त केले.

लोकशाही मुल्य रूजविण्यासाठी प्रशासनासह पोलीस विभाग नक्षलग्रस्त भागात कार्य करीत आहे. अनेक विकास कामे राबवून गरजूंना मदत करण्याचे कार्य पोलीस विभागाने गेल्या अनेक वर्षात या ठिकाणी केले आहे. गेल्या वर्षभरात एक लाखाहून अधिक आदिवासी आणि दुर्गम भागातील नागरिकांना विविध प्रमाणपत्रे तसेच शासनाच्या योजना पोहचविण्यात आल्या. आता दादालोरा खिडकीवर नागरिकांची गर्दी पाहून चित्र स्पष्ठ होत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दुर्गम भागातील नागरिकांना लोकशाही विचारसारणी, विकास आणि येथील पोलीस यांना स्विकारले आहे ही सत्यस्थिती आहे. असे प्रतिपादन दादालोरा महामेळाव्यात त्यांनी व्यक्त केले. राज्यमंत्री देसाई यांनी ग्यारापत्ती येथील आऊट पोस्टला जावून दादालोरा खिडकी आणि जनजागृती मेळाव्यास उपस्थिती दर्शविली. या ठिकाणी त्यांनी अनेक दुर्गम भागातील स्थानिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला. शासनाच्या योजना, पोलीसांचे कार्य याबाबत त्यांचेशी चर्चा केली. त्याचबरोबर पोलीस विभागातील कर्मचारी यांचेशी तेथील व्यवस्थेबाबत विचारपूस केली.

गडचिरोली येथे मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी वरिष्ठ अधिकारी व प्रत्यक्ष सुरक्षा व्यवस्थेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये चांगला समन्वय असल्याचे सांगितले. राज्यात अनेक ठिकाणी मी पोलीस विभागाचे कार्य पाहले आहे. मात्र गडचिरोली येथे पोलीसांना दुहेरी भुमिका पार पाडावी लागते. आणि त्यांचे कार्य सर्व राज्यात कौतुकास्पद असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात नमुद केले. यावेळी पोलीस उप महानिरीक्षक संदिप पाटील, पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक, अभियान, सोमय मुंडे तसेच इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी पोलीस विभागाच्या कामगिरीबाबत उपस्थितांना विविध माहिती दिली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

राज्यमंत्री, देसाई यांच्या हस्ते प्रमाणपत्र व साहित्याचे वाटप
राज्यमंत्री शंभुराज देसाई यांचे हस्ते मेळाव्यात 35 युवतींना शिलाई मशीन, 51 जणांना बदक पालनाचे साहित्य, 60 सुरक्षा रक्षक म्हणून निवड झालेल्यांना नियुक्ती पत्राचे वाटप, 25 दिव्यांग व्यक्तींना व्हील चेअर सायकलचे वाटप, 38 आत्मसमर्पितांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे कार्ड वाटप तसेच 3 आत्मसमर्पितांना घरकूल प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी संबंधित विभागाच्या तसेच कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेले प्रमाणपत्रांचे वाटप तसेच साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी पोलीस विभागाकडून तयार करण्यात आलेली चित्रफित राज्यमंत्री देसाई यांनी पाहिली. तसेच उपस्थितांना मार्गदर्शनही केले.

गडचिरोली पोलीस दलाचे कार्य
गृह राज्यमंत्री देसाई यांनी यावेळी गडचिरोली पोलीस दलाने केलेल्या विविध कामांची माहिती उपस्थितांना दिली. यात गेल्या वर्षभरात 49 नक्षलवाद्यांना मारण्यात यश आले. 20 नक्षलींना अटक केली. 8 जणांनी आत्मसमर्पन केले तसेच हे करत असताना 15 वेगवेगळया पोलीस नक्षली चकमक झाल्या. याचीच दखल घेत शासनाकडून त्यांना 34 शौर्य पदक, 138 विशेष सेवा पदक, 156 पोलीस महासंचालक पदक व 8 असाधारण आसूचना कुशलता पदक मिळालेली आहेत. आत्मसमर्पितांना घरकूल मिळवून दिले. रोजगारासाठी प्रशिक्षणांचे आयोजन केले. त्यांची आज काही उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. दादालोरा खिडकीमधून एक लाखाहून अधिक जणांना दुर्गम भागात फायदा झाला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

चकमकीत जखमी पोलिसांच्या घरी जाऊन तब्येती बाबत केली विचारपूस
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी गडचिरोली पोलीस दल आणि नक्षली यांच्यात झालेल्या चकमकीतील जखमी जवानांची घरी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्याबरोबर चकमकी बाबत चर्चा केली व तब्येतीची विचारपूस केली. राज्यमंत्री देसाई यांनी संबंधित जवानाला शासनाकडून जी काही मदत लागेल ते देण्याचे आश्वासनही दिले.

हे देखील वाचा : 

राज्यातील १३९ नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर

गडचिरोलीत आज नवीन 182 कोरोनाबाधित तर 220 जणांनी केली कोरोनावर मात

जेष्ठ साहित्यक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांना मुक्तिपथकडून भावपूर्ण श्रद्धांजली

 

Comments are closed.