Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सुरजागड प्रकल्पाला ग्रामसभा आणि सुरजागड पारंपरिक इलाखा गोटुल समीती ” खदान विरोधी”

  • स्थानिकांच्या नावावर विनाशकारी लोह खदान/प्रकल्प लादून आम्हाला उध्वस्त करु नका.
  • राजकीय पक्ष आणि संघटनांना जाहीर आवाहन.

एटापल्ली  8 जानेवारी :- सुरजागड पारंपरिक इलाख्यातील स्थानिक संपूर्ण ७० गावातील ग्रामसभांचा खदान खोदण्याला मागील अनेक वर्षांपासून कायदेशीर मुद्यांवर प्रखर विरोध केलेला आहे.या खदान विरोधी संघर्षाला भामरागड ( बेज्जूर), वेनहारा, तोडसा, पेरमीली, झाडापापडा, खुटगांव, पावीमुरांडा, कोरची या पारंपरिक इलाख्यातील शेकडो ग्रामसभांनी तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांनी समर्थन जाहीर करुन खदानी रद्द होण्यासाठी वारंवार पाठपुरावा करण्यात येत असतांनाही जिल्ह्यातील काही पक्ष आणि राजकीय पदाधिकारी सदर खदानी सुरु करण्याची जनविरोधी भुमिका मांडत असतात, त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय पक्ष सुरजागड पारंपरिक इलाख्यातील स्थानिक ग्रामसभा आणि जनतेच्या बाजूने आहेत की विरोधात आहेत, हे येत्या पंधरा दिवसांत लेखी समर्थन पत्र आणि वृत्तपत्रांमधून आपल्या राजकीय भूमिकेसह जाहीर करावे, असा ठराव ठाकुरदेव यात्रेच्या समारोपापुर्वी झालेल्या पारंपारिक प्रमुखांच्या बैठकीत पारीत करण्यात आला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली जिल्हयातील एटापल्ली तालुक्यातील सुरजागड परिसरातील सर्व गावांच्या ग्रामसभा भारतीय संविधानातील कलम 244/1 मधील तरतुदी व पंचायत उपबंध अनुसूचित क्षेत्रावर विस्तार अधिनियम 1996 अन्वये आपल्या धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक प्रथा, परंपरा आणि न्याय निवाडा व जल-जंगल-जमीन आणि साधन संपत्तीचे रक्षण व जतन आणि व्यवस्थापन व नियोजन करण्यास तसेच विकास योजना आणि स्वशासन व्यवस्था चालविण्यास सक्षम आहोत.तसेच अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी वन हक्क मान्यता कायदा-2006 व नियम-2008, सुधारित नियम-2012 च्या तरतुदींचीही ग्रामसभांव्दारे अंमलबजावणी सुरु आहे. अशा स्थितीमध्ये एटटापल्ली तालुक्यातील सुरजागड परिसरातील बांडे , सुरजागड , दमकोंडवाही, गुंडजूर-मोहन्दी व इतर ठिकाणी लोह खनिजाच्या खदानींस मंजूरी देवून व प्रस्तावित करुन सुरु करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
करीता भारतीय संविधानाच्या कलम 244/1च्या तरतुदी व पंचायत उपबंध अनुसूचित क्षेत्रांवर विस्तार अधिनियम 1996, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील प्रकरण तीन -अ च्या कलम 54 व अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी वन हक्क मान्यता अधिनियम 2006, नियम 2008 व सुधारित नियम 2012 च्या तरतुदी आणि महाराष्ट्र राज्याच्या महामहिम राज्यपालांनी दि. 04 मार्च2014 रोजी अधिसुचित केलेल्या पेसा नियमातील नियम 9,13,26,27 अन्वये ग्रामसभांना असलेल्या अधिकारा अंतर्गत आम्ही आमच्या स्थानिक ग्रामसभा आणि सुरजागड पारंपरिक इलाखा गोटुल समीतीच्या वतीने मानणीय राष्ट्रपती, मानणीय पंतप्रधान, मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य आणि संबंधित विभागांच्या सचिवांना मागील अनेक वर्षांपासून अनेकदा सादर करून सातत्याने सदर खदानी रद्द होण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

असे असतांनाही गडचिरोली जिल्ह्यातील काही राजकीय, सामाजिक नेते, कार्यकर्ते सदर खदानी, प्रकल्प सुरू करण्याची मागणी करुन आमच्या कायदेशीर लढाईत दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.या निवेदनाद्वारे आम्ही गडचिरोली जिल्ह्यातील खासदार, आमदार आणि सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांचे जिल्हाध्यक्ष म्हणून आमच्या वरील मुद्यांवर स्थानिक ग्रामसभा आणि सुरजागड पारंपरिक इलाखा गोटुल समीतीच्या, कोणत्याही परिस्थितीत खदान कायमस्वरूपी रद्द करा, या मागणीला जाहीर समर्थन द्यावे अशी विनंती करीत आहोत. पुढिल पंधरा दिवसांत स्थानिक वृत्तपत्रांच्या माध्यमातून आपली राजकीय भूमिका आपण जाहीर केली नाही तर आपण आमच्या स्थानिक ग्रामसभा आणि सुरजागड पारंपरिक इलाखा गोटुल समीतीच्या “खदान कायमस्वरूपी रद्द करा” या मागणीविरोधी आहात असे समजून आपण आणि आपल्या पक्ष, संघटनांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय आजच्या सुरजागड यात्रेदरम्यान उपस्थित ग्रामसभांचे प्रतिनिधी आणि जनतेने पारीत केलेला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

त्यामुळे आमच्या आवाहनाची दखल घ्यावी व सामान्य जनतेच्या लढ्यात सहभागी व्हावे असेही या ठरावात म्हटले असून तसे जाहीर आवाहन गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र खासदार अशोक नेते, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार, आमदार डाॅ.देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, काॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष डाॅ.नामदेव उसेंडी, भाजपा जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख राजगोपाल सुल्वावार, बसपा जिल्हा प्रभारी शंकर बोरकुट, वंचित बहुजन आघाडी, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, परिवर्तन पॅनलचे अध्यक्ष सुरेंद्रसिंह चंदेल
गोंडवाना गणतंत्र पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदिप वरखडे, पिरीपाचे जिल्हाध्यक्ष मुनिश्वर बोरकर, रिपब्लिकन पार्टी (आठवले)मेघराज घुटके, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे प्रा.प्रकाश दुधे, माजी आमदार तथा आविसंचे नेते दिपकदादा आत्राम, जिल्हा महाग्रामसभेचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष देवाजी तोफा, आम आदमी पार्टीचे जिल्हा प्रमुख बाळकृष्ण सावसाकडे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मारोती दुधबावरे यांना हे आवाहन पत्र सुरजागड पारंपरिक इलाख्याच्या वतीने ठराव पारित करून लिहिण्यात आलेले आहे.

Comments are closed.