Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

लेखकांच्या प्रत्यक्ष सहवासाने समृद्ध झालो – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ. प्रकाश आमटे

दिलीपराज प्रकाशनच्या सुवर्ण महोत्सव सोहळ्यात दिग्गजांची मांदियाळी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

पुणे डेस्क :- हेमलकसासारख्या दुर्गम आणि सुविधांपासून वंचित असलेल्या भागात काम करणे, हेच आमच्यापुढे एक मोठे आव्हान होते. बावीस वर्षे हेमलकसा मध्ये वीज नव्हती. अशावेळी वाचन हे दुरापास्त व्हायचे. परंतु, बाबांच्या व्यक्तींमत्वामुळे अनेक दिग्गज साहित्यिक आणि संगीतकार प्रत्यक्ष हेमकसाला नियमितपणे येत असल्याने आम्हाला नेहमी लेखकच वाचायला मिळाले. त्यामुळे या लेेखकांच्या लेखनाने आणि लेखकांच्या प्रत्यक्ष सहवासाने आम्ही समृद्ध झालो, अशा भावना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि मॅगसेसे पारितोषिक विजेते डाॅ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केल्या.

दिलीपराज प्रकाशनच्या सुवर्ण महोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजीत कार्यक्रमात आमटे बोलत होते. यावेळी लेखक आणि सरस्वती सन्मान पुरस्कार प्राप्त शरणकुमार लिंबाळे तसेच या वर्षीच्या साहित्य अकादमी पुरस्काराचे विजेते लेखक आबा महाजन यांचा डाॅ.आमटे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मभूषण डाॅ.शां.ब.मुजुमदार उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर दिलीपराज प्रकाशनाचे राजीव बर्वे, शरणकुमार लिंबाळे, आबा महाजन, मधुमिता बर्वे, नंदकिशोर बजाज आदी मान्यवर उपस्थित होते.

सुवर्ण महोत्सवानिमित्त नव्याने सुरु करण्यात आलेल्या दिलीपराज सुवर्ण स्मृती ग्रंथोत्तेजक पुरस्कारने गेल्या पन्नास वर्षांपासूनचे अमरावतीचे ग्रंथ वितरक नंदकिशोर बजाज यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान आला.

यावेळी डाॅ.अश्र्विनी धोंगडे लिखीत ‘बॅल्क अँड व्हाईट’ ही कादंबरी, प्रा.मिलिंद जोशी लिखीत कार्यकर्तृत्वांचे स्मरण असलेले ‘स्मरणयात्रा’, प्राचार्य पुरुषोत्त्म शेठ लिखीत ‘व्यक्तिचित्रणे स्मारिका’, ज्येष्ठ समाजसेवक विजय फळणीकर लिखित ‘पराजय नव्हे विजय’ हे आत्मचरित्र आणि बालवाड्मय मध्ये गाजलेले मालती बर्वे लिखित ‘गट्टी फू’ या पाच पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

डाॅ. प्रकाश आमटे म्हणाले की, आदिवासींची दुःख अनेक असतात. आपण त्यांचे दुःख समजून घेतले पाहिजे. दुःखाची पराकाष्टा झाल्याने त्यांच्या डोळ्यांतील अश्रू वाहणे देखील बंद झाले आहे. केवळ शुष्क डोळ्यांनी ते त्यांचे दुःख मांडतात. बाबांनी त्यांचे हे दुःख पाहिले आणि त्यांची जमीनदारी सोडून त्यांनी आदिवासींसाठी आपले जीवन वाहून घेतले. बाबांचे हे काम पुस्तक रूपाने पुढे आल्यामुळे बाबांच्या कामाला चांगले व्यासपीठ आणि चेहरा मिळाला. बाबांचे कार्य अनेक संस्था आणि तरूणांपर्यंत पोहोचल्याने कार्यकर्त्यांची फळी निर्माण झाली आणि मदतीचा ओघ सुरू झाला. यादृष्टीने पुस्तकांचे योगदान आणि महत्त्व अनन्यसाधारण आहे. दुस-यांचे दुःख पाहिल्याशिवाय दुःख काय असते हे कळत नाही. अन्यथा आपण आपलेच दुःख कुरवाळीत बसतो आणि आपलेच दुःख आपल्याला मोठे वाटते.

अध्यक्षीय मनोगतात पद्मभूषण डाॅ.शां.ब.मुजुमदार म्हणाले की, लेखकामुळे प्रकाशक प्रकाशझोतात येतात की, प्रकाशकांमुळे लेखक प्रकाशझोतात येतात हा वाद निरर्थक आहे. ज्याप्रमाणे गदिमांच्या गीतांना बाबुजींनी संगीत दिले, त्यात अतिश्रेष्ठ कोण हे ठरवणे कठीण आहे, तसेच लेखक- प्रकाशक यांच्यात श्रेष्ठ कोण असते, हे ठरविणे अवघड आहे. त्यांच्या अद्वैतातूनच अभिजात साहित्याची निर्मिती होते. अलीकडे पुस्तके वाचण्याचे प्रमाण घटलेे आहे, असे म्हटले जाते परंतु, वाचनाच्या पद्धती बदलल्या आहेत, मार्ग बदलले आहेत असे मी म्हणेल. तंत्रज्ञानाच्या सहकार्याने तरूण वर्ग आजही मोठ्या संख्येने वाचन करतांना दिसतो.

दिलीपराज प्रकाशनच्या सुवर्ण महोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.मिलींद जोशी, मधुमिता बर्वे, पुरस्कार प्राप्त लेखक आबा महाजन आणि शरणकुमार लिंबाळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रकाशित झालेल्या पुस्तकांचा परिचय डॉ. अश्विनी धोंगडे यांनी करून दिला.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात दिलीपराज प्रकाशनचे राजीव बर्वे यांनी दिलीपराज प्रकाशनाच्या 50 वर्षांच्या वाटचालीचा प्रवास उलगडला. मधुर बर्वे आणि अमृता बर्वे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.