Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांचे निधन

वयाच्या 94व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

मुंबई, 4 जून- मराठी चित्रपटसृष्टीचा काळ गाजवणाऱ्या प्रसिद्ध ज्षेष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचे आज निधन झाले. त्या 94 वर्षांच्या होत्या. मुंबईतील दादर येथील सुश्रुषा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्वासोच्छवासाचा त्रास आणि वयोमानानुसार इतर आजारांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारा दरम्यान, सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आपल्या अभिनयाने कोट्यावधी चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या सुलोचना दीदी यांचे मुंबईत निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात मुलगी, नात- नातजावई असा परिवार आहे. सुलोचना दीदी यांच्या निधनाने मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीतील एका पर्वाची अखेर झाली असल्याचे म्हटले जात आहे. सुलोचना दीदी यांच्या पार्थिवावर सोमवार, 5 जून रोजी शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी प्रभादेवी येथील निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

शनिवारी, 3 जून रोजी सुलोचना दीदी यांची तब्येत बिघडली आणि अशा स्थितीत त्यांना काल रात्रीपासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मार्च महिन्यातही सुलोचना यांची तब्येत बिघडली होती आणि त्यानंतरही त्यांना श्वासोच्छवासाच्या आणि वयोमानाशी संबंधित इतर आजारांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

सुलोचना दीदी यांनी चित्रपटसृष्टीत दिलेल्या योगदानासाठी 1999 मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्याशिवाय,  2004 मध्ये फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. 2009 मध्ये महाराष्ट्र सरकारने ‘महाराष्ट्र भूषण’ या राज्याच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

बेळगावमध्ये 30 जुलै 1928 रोजी जन्म झालेल्या सुलोचना दीदी यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात 1946 पासून केली. 1946 ते 1961 या काळात सासुरवास (1946), वहिनीच्या बांगड्या (1953), मीठ भाकर, सांगते ऐका (1959), लक्ष्मी आली घरा, मोठी माणसं आदी गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी मुख्य अभिनेत्री म्हणून भूमिका साकारली. सुलोचना दीदी यांनी 250 हून अधिक मराठी-हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

हे पण वाचा :-

Comments are closed.