Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महात्मा फुले कृषि विद्यापीठात मधमाशी पालनावर प्रशिक्षणाचे आयोजन दुसरी हरितक्रांती मधमाशीच्या माध्यमातून होणार – अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

अहमदनगर, दि. २१ मार्च :  जगाच्या वाढत्या लोकसंख्येला अन्न पुरविणे संभव होण्यासाठी भविष्यकाळात मधमाशांची भुमिका सर्वार्थाने महत्वाची ठरणार आहे. मधमाशी पालनामुळे ग्रामीण भागातील लोकांना पोषणाबरोबरच आर्थिक सुरक्षा मिळून ग्रामीण विकासाला चालना मिळु शकते. आजच्या काळातील शेतकरी तंत्रशुध्द शेती करु पाहत आहे. तंत्रशुध्द आधुनिक शेतीला मधमाशी पालनाची जोड दिली तर अन्नधान्य उत्पादनात मोठी वाढ होऊ शकते. याच अर्थाने दुसरी हरितक्रांती होण्यासाठी मधमाशी माध्यम होणार असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ यांनी केले.

राष्ट्रीय मधमाशी मंडळ, कृषि, सहकार आणि शेतकरी कल्याण विभाग, कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार आणि महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि किटकशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने दि. २१ ते २७  मार्च, 2022 असे सात दिवसीय शास्त्रोक्त मधमाशीपालन या विषयावरील प्रशिक्षण कार्यक्रम आयोजीत करण्यात आले आहे. या प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन डॉ. प्रमोद रसाळ बोलत होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

याप्रसंगी गोवर्धन, गंगापूर, नाशिक येथील सुप्रकृती मधुमक्षीका केंद्राचे संस्थापक संचालक डॉ. तुकाराम निकम व नाशिक येथील पुर्वा बायोटेकचे व्यवस्थापकीय संचालक तसेच पिंपळगाव बसवंत उद्यानाचे संचालक श्री. संजय पवार प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. यावेळी नंदुरबार कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, हळगांव कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद अहिरे, सहयोगी अधिष्ठाता (निकृशि) डॉ. श्रीमंत रणपिसे, धुळे कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. चिंतामणी देवकर, प्रशिक्षण वर्गाचे आयोजक व कृषि किटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सी.एस. पाटील, प्रशिक्षणाचे आयोजक समन्वयक डॉ. संतोष कुलकर्णी उपस्थित होते.

डॉ. रसाळ पुढे म्हणाले की मधमाशीपासुन उच्चप्रतिचे औषणी गुणधर्म असलेला तसेच जीवनसत्वयुक्त मध मिळतो. वेगवेगळ्या औद्योगीक व सौंदर्य प्रसाधानामध्ये उपयोगी पडणारे मेण मिळते. निसर्गामध्ये वनस्पतींचे अस्तित्व आणि जैव विविधता टिकविण्यामध्ये मधमाशांचा मोलाचा वाटा आहे. जगाच्या तुलनेत भारतामध्ये युवकांची संख्या मोठी आहे. ग्रामिण भागात रोजगार निर्मितीसाठी तसेच शेतकर्यांच्या उत्पादनात भरीव वाढ होण्यासाठी आधुनिक पध्दतीचे मधुमक्षीका पालन पुरक ठरणार आहे. श्री. संजय पवार आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की महाराष्ट्रात फळपिके व अन्नधान्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. त्यासाठी 2-3 लाख मधमाशा वसाहतींची गरज असतांना प्रत्यक्षात १५ ते २० हजार वसाहती अस्तीत्वात आहेत. यावर उपाय म्हणजे राज्यातील सर्व शेतकर्यांनी गटागटाने प्रत्येक गावात मधमाशी पालन सुरु करायला हवे. शेतकर्यांनी आवळा, शेवगा, मोहरी, सुर्यफुल या पिकांची लागवड करणे फायदेशीर ठरणार आहे. या पिकांवर औषधांची फवारणी तुलनेने कमी प्रमाणात होते. डॉ. तुकाराम निकम यावेळी म्हणाले की मधमाशी हा आपल्या निसर्गचक्रातील अन्नधान्य उत्पादन वाढीसाठी महत्वाचा घटक आहे. देशभरात जवळजवळ १२० पिके ही मधमाशीवर अवलंबुन आहेत. महाराष्ट्रातील ठरावीक पिकांचे परागीभवन तसेच उत्पादन मधमाशीशिवाय शक्य नाही.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यासाठी प्रत्येक शेतकर्याने शेतात १-२ मधीमाशाच्या पेट्या ठेवाव्यात. शेताच्या बांधावर फुले येणारी झाडे लावली पाहिजेत. मधमाशांना आकर्षित करण्यासाठी मिश्र पीक पध्दतीचा अवलंब केला पाहिजे. याचबरोबर प्रत्येकाने आज हरितक्रांतीसाठी परिस ठरु पाहणारी मधमाशी संवर्धनाची, तीला वाचविण्याची शपथ घ्यायला हवी असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या प्रशिक्षण वर्गामध्ये शास्त्रोक्त मधमाशीपालन, मशीमाशीच्या विविध प्रजाती, जीवनक्रम, मधमाशीच्या विविध प्रजातींचे संगोपनशास्त्र, हंगामी व्यवस्थापन व दर्जेदार राणीपालन तंत्र, डंखविरहीत मधुमक्षिकापालन, मधमाशी वसाहतीचे आधुनिक पध्दतीने व्यवस्थापन व किडनाशकांचे दुष्परिणाम या विषयावर सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सी.एस. पाटील यांनी केले. डॉ. सी.एस. चौधरी यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नंदकुमार भुते यांनी तर आभार डॉ. संतोष कुलकर्णी यांनी मानले. या कार्यक्रमासाठी सर्व विभाग प्रमुख तसेच विद्यापीठ कार्यक्षेत्रातील कृषि विज्ञान केंद्रे व महाविद्यालये येथील विषय विशेषज्ञ, शास्त्रज्ञ व शेतकरी उपस्थित होते.

हे देखील वाचा : 

लातूर शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने होणार ७० फूट उंचीचा पुतळा उभारणी

महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी अंगणवाडीतील बालकांशी केला दिलखुलास संवाद

 

 

Comments are closed.