नागपूर डेस्क, दि.१७ जानेवारी: जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेची सुरुवात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर राज्यभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर आता काही डॉक्टरांकडून स्वदेशी बनावटीची कोव्हॅक्सिन लस घेण्यास नकार देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी आणि नागपूरच्या शासकीय रुग्णालयातील काही डॉक्टरांनी ‘कोव्हॅक्सिन’ ही भारत बायोटेकनिर्मित स्वदेशी लस टोचून घेण्यास नकार दिला आहे.
कोव्हॅक्सिन लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या अपूर्ण असल्यामुळे या लसीच्या परिणामकारकतेबद्दल अद्याप साशंकता आहे. मात्र, तरीही केंद्र सरकारने या लसीला परवानगी दिल्यामुळे वादही निर्माण झाला होता. मात्र, आता डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनीच ही लस टोचून घेण्यास नकार दिल्याने पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
नागपुरातील प्रकार
नागपूरच्या एकूण १२ पैकी मेडिकल रुग्णालय या एकाच केंद्रावर स्वदेशी कोव्हॅक्सिन लस, तर इतर केंद्रांवर ऑक्सफर्डने विकसित केलेली आणि सीरम उत्पादित कोव्हिशील्ड लस आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली जात होती. नागपूरमधील ‘मेडिकल’ या रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर आपल्याला ‘ऑक्सफर्ड’ची ‘कोव्हिशील्ड’ लस देण्यात येईल, अशा अपेक्षेने डॉक्टर तेथे पोहोचले. परंतु तेथे स्वदेशी कोव्हॅक्सिन लस दिली जात असल्याचे समजल्यावर काही डॉक्टर या केंद्रातून आल्या पावली परतले.
पुण्यात कोरोना लसीकरणाकडे निम्म्या लोकांनी फिरवली पाठ
पहिल्याच दिवशी नोंदणी केलेल्यापैकी 45 टक्के आरोग्य कर्मचारी लसीकरणाला अनुपस्थितीत राहिले. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 800 आरोग्य सेवकांची निवड करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात 438 जणांनी लस टोचून घेतली.
32 जणांनी रुग्णालयात आल्यावर लस टोचून घेण्यास नकार दिला. तर 330 आरोग्य सेवकांनी वेगवेगळ्या कारणांनी लसीकरणाला दांडी मारली. पुण्यात काल दिवसभरात 55 टक्के लसीकरण झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यापूर्वी पहिल्या दिवशी 3 लाख जणांना लस देण्याचं टार्गेट ठेवण्यात आलं त्यापैकी फक्त 1 लाख 65 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस टोचण्यात आली. लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी टार्गेट पूर्ण करण्यात अपयश आलं आहे.
Comments are closed.