Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बोरिस जॉन्सन यांचा पंतप्रधानपदाचा राजीनामा

भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांचे नाव आघाडीवर आहे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

ब्रिटन 7 जुलै :- ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी अखेर पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. याआधी त्यांनी हुजूर पक्षाच्या संसदीय गटनेते पदाचा राजीनामा दिला होता. नवीन पंतप्रधानांच्या नावाची घोषणा होईपर्यंत जॉन्सन पदभार सांभाळणार आहेत. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या सरकारमधून मागील 24 तासात 39 मंत्र्यांनी राजीनामे दिले होते. त्यामुळे जॉन्सन यांच्यावर राजीनाम्याचा मोठा दबाव निर्माण झाला होता. ब्रिटनचे नवीन पंतप्रधान म्हणून भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांचे नाव आघाडीवर आहे. ऋषी सुनक हे भारतीय उद्योजक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत.

बोरिस जॉन्सन यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत भारतीय वंशाचे अर्थ मंत्री ऋषी सुनक आणि आरोग्य मंत्री साजिद जाविद यांनी पहिल्यांदा राजीनामा दिला होता. त्यानंतर ब्रिटन सरकारमध्ये राजीनाम्याची लाट उसळली. जॉन ग्लेन, प्रीति पटेल,  ग्रँट शॅप्स, रिचेल मॅक्लिएन आदींनी आपले राजीनामे देत सरकारच्या अडचणीत वाढ केली. काही मंत्र्यांनी पंतप्रधान बोरिस यांच्या निवासस्थानी जात आपले राजीनामे सादर केले. तर, काहींनी त्यांच्याच राजीनाम्याची मागणी केली होती.ब्रिटनमध्ये महागाईने मागील 40 वर्षातील उच्चांक गाठला आहे. बेरोजगारी वाढल्याने नाराजी वाढली आहे. ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेसमोर मोठं आर्थिक संकट उभे राहिले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.