आंबा पिकासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवू -कृषी मंत्री अब्दुल सत्तार
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
रोहा, 24 एप्रिल : शासनाने अर्थसंकल्पात कृषी विभागासाठी भरीव तरतूद केली आहे. त्यामुळे निधीची कमतरता नाही. आंब्याचे मोठे नुकसान यावर्षी झाले आहे. या पार्श्वभूमीवर आंबा पिकासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्यात येईल, असे प्रतिपादन कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज येथे केले. रोहा तालुक्यातील किल्ला येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली व डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत असलेल्या कृषी विज्ञान केंद्राच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन व आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष 2023 या निमित्ताने आयोजित शेतकरी मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना कृषी मंत्री अब्दुल सत्तार बोलत होते.
यावेळी उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे, माजी पालकमंत्री तथा आमदार कु.आदिती तटकरे, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, किल्ला सरपंच योगेश बामुगडे, डॉ.बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठचे संशोधन संचालक डॉ. संजय भावे, शिक्षण संचालक डॉ. बाळकृष्ण देसाई, विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रमोद सावंत, कृषी विज्ञान केंद्र किल्लाचे कार्यक्रम समन्वयक डॉ. मनोज तलाठी आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री उदय सामंत यांनी कोकणातील आंबा पिकावर सातत्याने रोगराई येत असल्याने आंबा उत्पादन कमी होताना दिसत आहे. त्यामुळे विद्यापीठाने यावर संशोधन करण्याची आवश्यकता आहे. शालेय शिक्षणात कृषी शिक्षणाचा अभ्यास समाविष्ट करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया, असे सांगितले. याप्रसंगी खा.सुनील तटकरे यांनी देशाचे तत्कालीन कृषी मंत्री शरद पवार यांच्या माध्यमातून आम्ही किल्ला येथे आणलेल्या काढणी पश्चात तंत्रज्ञान या विद्यालयात पीएचडीची शाखा उपलब्ध करण्याची मागणी केली.
आ.कु.आदिती तटकरे यांनी कृषी विज्ञान केंद्रात शेतकऱ्यांसाठी व महिला शेतकऱ्यांसाठी दर आठवड्याला उपक्रम आयोजित करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. आपण पालकमंत्री असताना तळा तालुक्यात विद्यापीठासाठी 125 एकर जागा उपलब्ध करून दिली आहे तर दिवेआगर येथील सुपारी संशोधन केंद्रासाठी पाच एकर जागा उपलब्ध करून दिली आहे. या दोन्ही प्रकल्पासाठी प्रत्येकी 50 लाखाचा निधी मंजूर करण्याची विनंती त्यांनी कृषीमंत्र्यांना केली.
यावेळी प्रास्ताविकात प्रमोद सावंत यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रशिक्षण, प्रात्यक्षिके, शेतकऱ्यांचे कौशल्य वाढवणे आदी उपक्रम राबवीत असल्याचे सांगत भुईमूग, मत्स्य शेती, भाजीपाला, शेळीपालन या उद्योगाला चालना देण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र काम करीत आहे, असे सांगितले. याप्रसंगी जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
Comments are closed.