अखेर विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती
दिल्ली हायकमांडने वडेट्टीवार यांच्यांकडे विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सोपावली आहे.
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
मुंबई, 1ऑगस्ट 2023 ; अखेर दिल्ली हायकमांडने विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी अखेर विजय वडेट्टीवार यांच्यांकडे धुरा सोपावली आहे. मात्र विधिमंडळ पक्षनेते पदाची जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्याकडेच असणार आहे. विधानसभेचा विरोधी पक्षनेता कोणाला करायचं हा निर्णय काँग्रेसच्या हायकमांडकडे अडकलेला होता.
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर असताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली. यानंतर विधानसभेचे विरोधी पक्ष नेतेपद रिकामे झाले होते. यानंतर काँग्रेसकडे विरोधी पक्षनेते पदाची निवड करण्याची संधी आली. यावेळी काँग्रेसमधील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार आणि माजी महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांच्या नावांवर चर्चा रंगली होती. पण अखेर विजय वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला.
शिवसेनेत गेल्यावर्षी फूट पडल्याने सत्तेतून पायउतार झाल्यानंतर महाविकास आघाडीत सर्वात जास्त 53 संख्याबळ असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठरला. त्यामुळे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेले. वर्षभर विरोधी पक्षनेतेपदी अजित पवार होते. पण अजित पवार देखील भाजपसोबत हात मिळवणी करत सरकारमध्ये सामील झाले आणि विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देऊन त्यांनी 2 जुलै 2023 रोजी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासमवेत राष्ट्रवादीच्या अन्य 8 नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीत मोठी फूट पडल्याने 44 संख्याबळ असलेल्या काँग्रेसकडे आता विरोधी पक्षनेतेपद गेले आहे.
हे पण वाचा :-
Comments are closed.