Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नाशिक येथे २४ ऑक्टोबर रोजी बोधीवृक्ष महोत्सव…

बोधीवृक्ष महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा - मंत्री छगन भुजबळ

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

भगवान पगारे, नाशिक, 17 ऑक्टोंबर : त्रिरश्मी बुद्ध लेणी येथील बुद्ध स्मारकाच्या परिसरात येत्या २४ ऑक्टोबर रोजी श्रीलंकेतील अनुराधापुर येथील बोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण केले जाणार आहे. या बोधीवृक्ष स्थापना महोत्सवासाठी देशभरातून मान्यवर व उपासक येणार आहेत. त्यादृष्टीने कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शासकीय यंत्रणेसह व नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे. असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

शहरात त्रिरश्मी बुद्ध लेणी येथे दि.२४ ऑक्टोबर २०२३ रोजी विजयादशमीच्या मुहूर्तावर बोधीवृक्षाच्या फांदीरोपण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाबाबत माहिती देण्यासाठी भुजबळ फार्म कार्यालय नाशिक येथे राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्टचे मुख्य संयोजक भदत्न सुगत थेरो, भदत्न संघरत्न, समिती सदस्य आनंद सोनवणे, बाळासाहेब कर्डक, रंजन ठाकरे, बॉबी काळे, बाळासाहेब शिंदे, दिलीप साळवे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मंत्री छगन भुजबळ यावेळी म्हणाले, शहरात हा मोठा महोत्सव विजयादशमीच्या दिवशी होत आहे. त्रिरश्मी बुद्ध लेणी येथील बुद्ध स्मारकाच्या परिसरात २४ ऑक्टोबर रोजी श्रीलंकेतील अनुराधापुर येथील बोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण केले जाणार आहे. या महोत्सवास श्रीलंका, थायलंड, कोरिया, ब्रम्हदेश, मलेशिया, जापान, तैवान, व्हिएतनाम व कंबोडिया या देशातील अतिमहत्वाच्या व्यक्ती आणि भन्ते व उपासक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी बुद्धस्मारक परिसरात वाहन व्यवस्था, येणाऱ्या बौद्ध उपासकांची निवास, भोजन व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था व इतर सोयी-सुविधांचे नियोजन करण्यात येत आहे. या महोत्सवासाठी शासनाकडून १८ कोटी ४ लाख ६७ हजारांचा निधी मंजूर झाला आहे. त्याबाबचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे. गुरु दलाई लामा यांनाही कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे. या निधीतून महोत्सवासाठी संपूर्ण भागाच्या सुशोभिकरणासाठी ८ कोटी ३६ लाखांचा खर्च केला जाणार आहे. भिक्खु निवासस्थानाचा आराखडा तयार करण्यात आला असून त्यांच्या अनुषंगिक सुरक्षेसाठी साडेसात कोटींचा निधी खर्च केला जाणार आहे. तसेच बोधीवृक्षाचे रोपण झाल्यानंतर त्याच्या सुरक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे. अशी माहितीही मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिली. नागरिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहनही मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले, बोधीवृक्ष महोत्सवासाठी मोठ्या संख्येने नागरिक येण्याची शक्यता असून त्यादृष्टीने वाहतुक व्यवस्था नियोजनाचे कामही सुरू करण्यात आले आहे. सम्राट अशोक यांनी सुद्धा विजयादशमीच्या दिवशी बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही विजयादशमीच्या दिवशीच नागपूर येथे धम्मदिक्षा घेतली. शांततेचा संदेश देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. असेही मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

बोधीवृक्षाचे ऐतिहासिक महत्व असून सिद्धर्थ गौतम बुद्ध यांना निरंजना नदिच्या काठावर बोधी वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले. त्यामुळे हे बोधीवृक्ष अतिपूजनीय आहे. पुढे सम्राट अशोक यांच्या मुलांनी या बोधीवृक्षाची फांदी श्रीलंकेच्या देवानामप्रिय तिरस यांच्या हस्ते अनुराधापूर येथे स्थापित केली. याच बोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण नाशिक शहरात करण्यात येणार असल्याने शहराच्या ऐतिहासिक महत्वात भर पडणार असल्याची माहिती शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्टचे मुख्य संयोजक भदत्न सुगत यांनी यावेळी दिली.

मंत्री छगन भुजबळ यांनी केली बोधीवृक्ष महोत्सव कार्यक्रम स्थळी पाहणी – यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी त्रिरश्मी बुद्ध लेणी बोधीवृक्ष स्थापनेचे नियोजित स्थळ व सभा ठिकाण यांची पाहणी केली. यावेळी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, शहर अभियंता एस.आर.वंजारी, आनंद सोनवणे, शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्टचे मुख्य संयोजक भदत्न सुगत यांच्यासह महानगरपालिकेसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या महोत्सवास प्रमुख निमंत्रित

१. श्रीलंका येथील बोधीवृक्षाचे प्रमुख पुज्यनीय हेमरत्र नायक थेरो

२. मलेशिया देशाचे प्रमुख पुज्यनीय भिक्खु सरणांकर महावेरी

३. थायलंड देशाचे प्रमुख पुज्यनीय भिक्खू डॉ. पोचाय

४. कंबोडिया देशाचे महासंघराज पुज्यनीय भिक्खू समदेच प्रेह सांगखरेच बोर काय

५. श्रीलंका देशातील दंतधातू विहाराचे प्रमुख पुज्यनीय भिक्खू नाराणपणाचे आनंदा थेरो

६. श्रीलंका देशाचे महानायक पुज्यनीय भिक्खू डॉ चास्कन्दुवे महिंदास महानायके थेरो

७. महाराष्ट्र भिक्खू संघाचे सल्लागार प्राचार्य डॉ. भदन्त खेमथम्मी महास्थवीर

प्रमुख अतिथी उपस्थित राहणार

1. एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य)

२. रामदास आठवले (केंद्रीय राज्य मंत्री, भारत सरकार))

३. देवेन्द्र फडणवीस (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य)

४. अजित दादा पवार (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य)

५. दादा भुसे (पालकमंत्री, नाशिक )

६. छगन भुजबळ (कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य)

७. गिरीश महाजन (कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य)

८. भीमराव आंबेडकर (राष्ट्रीय कार्याध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा)

९. (आमदार) राहुल ढिकले , यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.