Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 15 मे – केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत दर वर्षीप्रमाणे याही वर्षी राष्ट्रीय डेंग्यू दिन दिनांक १६ मे २०२४ रोजी साजरा करण्यात आला.
१६ मे हा दिवस डेंग्यू आजाराविषयी जनतेमध्ये जागृती निर्माण व्हावी या करता साजरा करण्यात येतो. “समुदायाच्या संपर्कात रहा, डेंग्यूला नियंत्रित करा” ही या वर्षीची मुख्य संकल्पना आहे. डेंग्यू आजाराचा प्रसार हा एडिस इजिप्ती या डासांच्या चावण्यापासून होतो. या डासांची उत्पत्ती साठवणूक केलेल्या स्वच्छ पाण्यात होते. डेंग्यू आजाराला प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी आपल्या घरातील पाणी साठवणूकीचे भांडे आठवड्यातून एकदा रिकामे व कोरडे करुन भरावे एक दिवस कोरडा दिवस पाळण्यात यावा. आपल्या घराच्या आजुबाजूचा परिसर स्वच्छ राहील याची काळजी घ्यावी. साठवलेल्या पाण्याचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करावे आणि डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे निर्माण होऊ देऊ नये, तसेच आवश्यक दक्षता बाळगून आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. लोकेशकुमार कोटवार यांनी केले आहे.

जिल्ह्यात काही भागात अतिपाऊस, वाढते शहरीकरण, स्थलांतराचे प्रश्न, विविध विकास कामे अशा अनेक कारणामुळे डेग्यू आजाराचे प्रमाणात वाढ होते. डेंग्यू डासांची उत्पत्ती साठलेल्या पाण्यात होत असल्याने पाणी व्यवस्थापन योग्य रितीने केल्यास डासांची निर्मिती व पर्यायाने हिवताप, डेंग्यूचे प्रमाण शहरात व आपल्या गावात निश्चित कमी होईल. यासाठी घराजवळ असलेली नाले वाहते करुन डासोत्पत्ती स्थाने नष्ट करण्यात यावीत. नष्ट करता न येणाऱ्या मोठ्या डासोत्पत्ती स्थानांमध्ये गप्पी मासे सोडण्यात यावीत. पाण्याच्या साठ्यांना घट्ट झाकण बसवावे. घरातील टाक्या, हौद कुलर, फ्रिजचा ड्रिप पॅन नियमित स्वच्छ करावा. गटारी वाहती करावीत आणि छोटे खड्डे व डबकी बुजवावीत. अंगभर कपडे घालावेत. झोपतांना मच्छरदाणीचा तसेच डास प्रतिबंधक साधनांचा वापर करावा.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आजाराची लक्षणे – एकाएकी ताप येणे, तीव्र डोकेदुखी, डौळ्यांच्या खोबणीत वेदना, सांधेदुखी, सर्वांग दुखणे, अंगावर पुरळ येणे, पोट दुखणे, भूक मंदावणे, उलट्या होणे, प्रसंगी उलट्यातून रक्त येणे, तोंडाला कोरड पडणे, नाकातोंडातून हिरडयातून रक्त स्त्राव होणे, रक्त मिश्रीत काळसर संडास होणे ही डेंग्यू तापाची लक्षणे आहेत.

वरील डेंग्युबाबत लक्षणे आढळल्यास त्वरीत नजीकच्या जिल्हा सामान्य रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन मोफत रक्त तपासणी करावी आणि औषधोपचार घ्यावे. तसेच खाजगी लॅब धारकांनी डेंग्यू रुग्णांचे नमूने जिल्हा रुग्णालयात पाठविण्याची कार्यवाही करावी. डेंग्यू या आजाराचे निश्चित निदानासाठी इलायझा टेस्ट ही परिपूर्ण चाचणी आहे. ही चाचणी गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील सेन्टीनल सेन्टर येथे मोफत करण्यात येते, अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी यांनी प्रस्ताविकेत्तून दिली. तसेच कार्यक्रमाचे जिल्हा हिवताप नोडल अधिकारी डॉ. नन्नावारे यांनी डेंग्यू रोगाचा प्रसार कमी करण्यासाठी मार्गदर्शन केले. जिल्हा किटकजन्य आजार सल्लागार राजेश कार्लेकर यांनी डेंग्यू आजाराबाबत मार्गदर्शन केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कार्यक्रमाचे संचालन विलास नैताम यांनी केले तर आभार संदीप नंदनवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता हिवताप व हत्तीरोग विभागातील कर्मचारी यांनी सहकार्य केले. असे जिल्हा हिवताप अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.

हे पण वाचा :-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.