गोंडवाना विद्यापीठात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाचे आयोजन
दि. 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2025 पर्यंत विविध उपक्रम
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, दि.30: महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सूचनेनुसार विद्यार्थी, विद्यार्थीनींची वाचन संस्कृती वाढविण्याकरिता गोंडवाना विद्यापीठामध्ये “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत असून सदर उपक्रमांतर्गत दि. 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2025 या कालावधीत वाचन पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे.
या अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून दि. 1 जानेवारी रोजी सकाळी 11.30 वाजता कुलगुरु डॉ. प्रशान्त बोकारे यांच्या अध्यक्षतेखाली सामुहिक वाचन होणार आहे. तर दुपारी 12.30 वाजता डॉ. सविता गोविंदवार व डॉ. शिल्पा आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली वाचन कौशल्य कार्यशाळा होणार आहे. यावेळी विद्यापीठामध्ये विविध ग्रंथांचे प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे. 7 जानेवारी रोजी दुपारी 12.00 वाजता सुप्रसिध्द कथाकार प्रमोद बोरसरे व साहित्यिक तसेच सामाजिक कार्यकर्ता उपेंद्र रोहणकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाचन संवाद उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 16 जानेवारी रोजी दुपारी 12.00 वाजता पुस्तक परिक्षण व कथन स्पर्धा आयोजित करण्यात आली असून 26 जानेवारी रोजी पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.
वाचन संस्कृतीच्या विकासाने तरुणांच्या व्यक्तीमत्त्वाचे भरणपोषण होण्यास तसेच सामाजिक प्रबोधन होण्यास मदत होते. परंतु, अलीकडच्या काळात देशाचा तरुण वाचन संस्कृतीपासून दुरावत चाललेला असल्याचे आढळून येते. त्यामुळे तरुण पिढीला प्रत्यक्ष ग्रंथ वाचनाकडे आकर्षित करण्याची आवश्यकता असल्याने विद्यापीठामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती गोंडवाना विद्यापीठाच्या वाचन संकल्प महाराष्ट्राचा संयोजन समितीच्या समन्वयक डॉ. रजनी वाढई यांनी देऊन उपक्रमांमध्ये विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
हे ही वाचा,
जिल्हयातील २ हजार २२७ युवा बेरोजगारांना ‘मुख्यमंत्री दूत’ म्हणुन संधी !
Comments are closed.