सजग नागरीक बनण्यासाठी वाचन आवश्यक – प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे
"वाचन संकल्प महाराष्ट्राचा" उपक्रमाची सुरुवात
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, दि.01: वाचन संस्कृतीमुळे माणसाची विचारप्रक्रीया विकसीत होत असल्याने सजग तसेच सुजाण नागरीक बनण्यासाठी विविध प्रकारच्या साहित्याचे वाचन करणे आवश्यक असल्याचे मत गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे यांनी विद्यापीठामध्ये व्यक्त केले.
वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, मानव्य विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्याम खंडारे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनिल गजभारे, वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमाच्या समन्वयक डॉ. रजनी वाढई उपस्थित होते.
श्री. कावळे म्हणाले, विद्यार्थ्यांनी कथा, कादंबरी, ललित, आत्मचरित्रे, कविता अशा विविध साहित्य प्रकारांचे वाचन करणे गरजेचे आहे. आत्मचरित्रात्मक वाचनामुळे यशस्वीतेची तसेच महापुरुषांच्या जडणघडणीची प्रचिती येत असल्याने जगण्याची प्रेरणा मिळत राहते. वाचनामुळेच माणूस खऱ्या अर्थाने समृध्द होतो. अनिल हिरेखण म्हणाले, वाचनामुळे प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याचे सामर्थ्य मिळते. जी व्यक्ती नेहमी वाचन करते ती व्यक्ती सदैव जीवनामध्ये यशस्वी वाटचाल करीत राहते. डॉ. श्याम खंडारे यांनी आपल्या मनोगतामधून विद्यार्थ्यांना उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
उद्घाटन कार्यक्रमानंतर सामुहिक वाचन करण्यात आले. तर वाचन कौशल्य कार्यशाळेमध्ये सहा. प्रा. डॉ. शिल्पा आठवले व सहा. प्रा. डॉ. सविता गोविंदवार यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा ग्रंथालय, विद्यापीठाचे ज्ञान स्त्रोत केंद्र व विविध अध्यासनाच्यावतीने ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी हजारो पुस्तकांचा लाभ घेतला.
प्रास्ताविक व स्वागत डॉ. रजनी वाढई यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सविता गोविंदवार यांनी केले प्रथम सत्रातील आभार सहा. प्रा. रोहित बापू कांबळे यांनी तर द्वितीय सत्रातील आभार सहा. प्रा. विकास चित्ते यांनी मानले.याप्रसंगी विद्यापीठातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाचन संकल्प महाराष्ट्राचा संयोजन समितीचे सदस्य व ज्ञान स्त्रोत केंद्रातील कर्मचारी यांचे योगदान लाभले.
“वाचन संकल्प महाराष्ट्राचा” या उपक्रमातंर्गत विद्यापीठामध्ये दि. 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2025 या कालावधीत विविध उपक्रमाद्वारे वाचन पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे.
हे ही वाचा,
चिचडोह बॅरेजचा पाणीसाठा सिंचनासाठी मिळण्याचे नियोजन करा – संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ
Comments are closed.