‘विद्यापीठात मराठी विभागाच्या वतीने साजरा होतोय मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठातील मराठी विभागाच्यावतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जात आहे. त्याचे उद्घाटन आज मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता तथा समन्वयक मराठी विभाग डॉ. श्याम खंडारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यापीठातील सहा. प्रा.डॉ. हेमराज निखाडे, प्रा. अमोल चव्हाण, डॉ. रजनी वाढई, डॉ. प्रिया गेडाम, डॉ. कृष्णा कारु, डॉ. प्रफुल्ल नांदे, डॉ. नीळकंठ नरवाडे, डॉ. सविता गोविंदवार, प्रा. संदीप कागे, प्रा. विकास पुनसे उपस्थित होते.
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उपक्रमाची सुरुवात डॉ. देवदत्त तारे यांच्या मराठी भाषा आणि तंत्रज्ञान उपयुक्तता या विषयावरील कार्यशाळेने करण्यात आली. यावेळी त्यांनी मराठी भाषा आणि तिची वाटचाल, विस्तार, मराठी भाषेचे माहात्म्य, मराठी भाषा आणि बोली, मराठी भाषेचे अभिजातपण याबाबतच अत्यंत सखोलपणे मार्गदर्शन केले. अलिकडे मराठीची तंत्रज्ञानात वाटचाल होत असताना रोजगाराच्या संधी मिळविण्यासाठी मराठी भाषा हे नवे क्षेत्र निर्माण झाले. त्यात विद्यार्थी स्वयंरोजगार निर्माण करु शकतात असेही ते म्हणाले.
विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशान्त बोकारे, प्र- कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून कार्यशाळेमध्ये १७ जानेवारी रोजी बातमी कशी लिहावी? या विषयावरील कार्यशाळेमध्ये प्रा.रोहित कांबळे, दि.२० जानेवारी रोजी स्पर्धा परीक्षा आणि मराठी व्याकरण या विषयावर डॉ. हेमराज निखाडे, दि. २१ जानेवारी रोजी अभिजात मराठी भाषा आणि रोजगार संधी या विषयावर समीक्षक डॉ. सुदर्शन दिवसे, दि. २३ जानेवारी रोजी नाट्यलेखन तंत्र या विषयावर सुप्रसिद्ध नाट्यलेखक प्राचार्य डॉ. सदानंद बोरकर, दि. २७ जानेवारी रोजी सूत्रसंचालन कसे करावे? या विषयावर सुप्रसिध्द सूत्रसंचालक आणि साहित्य समीक्षक डॉ. कोमल ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती मराठी भाषा पंधरवडा उपक्रम समन्वयक डॉ. हेमराज निखाडे यांनी प्रास्ताविक पर मनोगतामध्ये दिली. सूत्रसंचालन तुषार दुधबावरे यांनी केले. आभार उपक्रम सहसमन्वयक प्रा. अमोल चव्हाण यांनी मानले.
कार्यशाळेसाठी विद्यापीठातील तसेच अधिनस्त महाविद्यालयांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यशाळेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मराठी विभागाचे समन्वयक तथा मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्याम खंडारे यांनी केले आहे
Comments are closed.