Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भ्रष्टाचाराला बढावा देणाऱ्यांची गय केली जाणार नाही – जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली: सामान्य नागरिकांना त्रास देणाऱ्या आणि भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, कोणाचीही गय केली जाणार नाही असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिला.

आज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली भ्रष्टाचार निर्मूलन आढावा सभा पार पडली. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी तसेच भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अशासकीय सदस्य उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

भ्रष्टाचार निर्मूलनाच्या आढावा बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले की, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कोणत्याही दबावाखाली न येता भ्रष्टाचाराला सहकार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवरही कठोर कारवाई करावी.

भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

बैठकीत जिल्हाधिकारी पंडा यांनी स्पष्ट केले की, काही अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे सांगून भ्रष्टाचाराला सहकार्य करतात, असे खोटे प्रकार अजिबात सहन केले जाणार नाहीत. अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला भ्रष्टाचाराच्या घटनांवर स्वायत्तपणे कारवाई करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यामुळे त्यांनी कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता कठोर मोहिम राबवावी आणि भ्रष्टाचाराच्या घटनांवर आक्रमक कारवाई करावी.

तक्रारींचा तातडीने पाठपुरावा करा

जिल्हाधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराच्या तक्रारी गांभीर्याने घेण्याचे सांगताच प्राप्त तक्रारींवर वेळीच कारवाई करून दोषींना कायदेशीर शिक्षा द्यावी, अशा सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्रभावी कारवाईसाठी सापळे रचून भ्रष्ट अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडावे आणि त्यांच्यावर कठोर पावले उचलावीत, असे निर्देश त्यांनी दिले.

भ्रष्टाचार निर्मूलनासाठी ठोस पावले

या बैठकीत जिल्ह्यातील भ्रष्टाचार निर्मूलनाच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी पंडा यांनी स्पष्ट केले की, प्रशासन भ्रष्टाचाराच्या बाबतीत कोणतीही तडजोड करणार नाही. नागरिकांनी भ्रष्टाचारासंदर्भात तक्रारी केल्यास त्याची गांभीर्याने दखल घेतली जाईल आणि दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल.

जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये पारदर्शकता आणि जबाबदारी वाढवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. भ्रष्टाचार निर्मूलनाच्या दृष्टीने प्रशासनाची भूमिका ठाम असून, कोणालाही सूट दिली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश जिल्हाधिकारी पंडा यांनी या बैठकीत दिला. बैठकीला संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.