गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नांना यश : स्वातंत्र्यानंतर प्रथमच कटेझरी-गडचिरोली बससेवा सुरू..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर प्रथमच गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या मौजा कटेझरी गावात बससेवा सुरू करण्यात आली असून, या ऐतिहासिक क्षणाचे नागरिकांनी वाजतगाजत स्वागत केले.
गडचिरोली जिल्हा आदिवासीबहुल आणि नक्षलप्रभावित भाग म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील दुर्गम-अतिदुर्गम भागांत राहणाऱ्या नागरिकांना दळणवळणासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. प्रवासासाठी रस्ते नसल्याने अनेकदा नागरिकांना मैलोन्मैल पायी प्रवास करावा लागत असे. ही परिस्थिती बदलण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत.
याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून काल (दि. २६ एप्रिल) कटेझरी ते गडचिरोली अशी बससेवा सुरू करण्यात आली. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सहकार्याने आणि पोलीस दलाच्या संरक्षणाखाली सुरू झालेल्या या बससेवेचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांच्या हस्ते करण्यात आले. पोलीस स्टेशन कटेझरीचे प्रभारी अधिकारी पोउपनि. अजय भोसले यांनी हिरवा झेंडा दाखवून बस मार्गस्थ करण्यात आले.
गावात स्वातंत्र्यानंतर प्रथमच बस आल्यानंतर भागातील नागरिकांनी ढोल-ताशांच्या गजरात, फुलांची उधळण करत मोठ्या उत्साहाने बसचे स्वागत केले. या प्रसंगी गावकऱ्यांचे आनंदाश्रू अनावर झाले.
ही बससेवा केवळ कटेझरीपुरती मर्यादित राहणार नसून आसपासच्या १० ते १२ गावांनाही या सेवेचा लाभ होणार आहे. शिक्षणासाठी प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि दैनंदिन कामासाठी गडचिरोलीस जाणाऱ्या नागरिकांना या सेवेमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे वर्षभर दळणवळण सुलभ होणार असून, पायपीट आणि वेळ वाचणार आहे.
गडचिरोली पोलीस दलाच्या विविध उपक्रमांतून मागील पाच वर्षांत ४३४.५३ किलोमीटर लांबीचे १८ रस्ते व ५९ पूल पोलीस संरक्षणाखाली बांधण्यात आले आहेत. याच मालिकेत गट्टा ते गर्देवाडा व वांगेतुरी बससेवेची सुरुवात १ जानेवारी २०२५ रोजी झाली होती.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या संकल्पनेतून, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम. रमेश, उपविभागीय पोलीस अधिकारी (धानोरा) जगदीश पांडे व पोलीस उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली, कटेझरी पोलीस ठाण्याचे पोउपनि. अजय भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेऊन या उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी केली आहे.
या उपक्रमामुळे पोलीस व जनतेमधील विश्वासाचे नाते अधिक बळकट होईल आणि दुर्गम भागातील विकासाचा नवा अध्याय सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
Comments are closed.