उन्हाळ्यातही ओसंडून वाहणारा ‘परसेवाडा धबधबा’ ठरत आहे पर्यटकांचे नवे आकर्षण
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : भीषण उकाड्याने संपूर्ण राज्य होरपळत असतानाच गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील घनदाट जंगलाच्या कुशीत वसलेला परसेवाडा धबधबा पर्यटकांसाठी निसर्गाचा शांत आश्रय ठरत आहे. विशेष म्हणजे हा धबधबा फक्त पावसाळ्यात नव्हे, तर भर उन्हाळ्यातही अविरत वाहतो – त्यामुळेच तो सध्या पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहे.
सिरोंचा वनविभागाच्या प्राणहिता अभयारण्यामध्ये वसलेला हा बारमाही धबधबा, अहेरी आणि सिरोंचा तालुक्याच्या सीमेलगत मूडेवाही परिसरात आहे. जंगलात खोलवर लपलेला हा धबधबा, निसर्गाच्या रम्य सान्निध्यात झुलणारा आणि शहरांच्या कटीपासून दूर, एक नैसर्गिक रत्नच म्हणावे लागेल.
धबधबा आणि आजूबाजूचा निसर्ग : जणू काही चित्रपटातील दृश्य..
परसेवाडा धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी थोडेसे साहस करावे लागते. परसेवाडा–बेजुरपल्ली रस्त्यावर वाहन थांबवून सुमारे एक किलोमीटरचा पायवाटेचा जंगलमार्ग पार करावा लागतो. दोन डोंगरांच्या मधून वाहणाऱ्या नाल्यांच्या थंड पाण्यातून वाट काढताना पर्यटक अक्षरशः हरखून जातात. अवतीभवती पसरलेले हिरवेगार वृक्ष, पक्ष्यांचे किलबिलाट आणि मधूनच ऐकू येणारा धबधब्याचा आवाज – हे सर्व मनाची ताजगी निर्माण करतात.
धबधब्याच्या उगमाजवळ पोहोचल्यावर, त्याच्या खालच्या बाजूला विसावलेले तळे, उंचावरून खाली कोसळणारे पाणी आणि भोवतालच्या दगडांवर बसून त्याचा आनंद लुटणारे पर्यटक, हे दृश्य अविस्मरणीय ठरते. येथे एक दिवस घालवला की उकाड्याचे सर्वच विसर पडते.
पर्यटनाच्या दृष्टीने प्रचंड शक्यता, पण दुर्लक्षित..
या परिसरात परसेवाडा धबधब्यासोबतच बेजुरपल्लीजवळील लिंगोजंगो संभुगवरा पेनठाना, देचलीपेठा येथील ‘जितम’ – नद्यांतील नैसर्गिक जलपात्र, कल्लेड पाहाडी परिसरातील शिवलिंग व झरे, तसेच सिरोंचा वनविभागातील एकमेव हत्तीकॅम्प अशी अनेक आकर्षणे आहेत. या सर्व ठिकाणांचा योग्य विकास झाल्यास गडचिरोली जिल्हा राज्याच्या पर्यटन नकाशावर ठळकपणे उमटू शकतो.
राज्यभरातून पर्यटकांची वाढती गर्दी..
अहेरीपासून सुमारे ४५ किलोमीटर आणि आलापल्लीहून सुमारे ६५ किलोमीटर अंतरावर असलेला हा धबधबा, उन्हाळ्यातही पाण्याने ओसंडून वाहतो, ही बाब पर्यटकांसाठी आश्चर्याचा विषय बनली आहे. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळताच स्थानिकांसोबतच नागपूर, चंद्रपूर, भंडारा, तसेच तेलंगणातूनही पर्यटक येथे येऊ लागले आहेत.
प्रशासनाकडे अपेक्षा : सुविधांची गरज..
अद्याप या पर्यटनस्थळाजवळ कोणतीही मूलभूत सुविधा नाही. रस्ता अपुरा, दिशादर्शक फलक नाहीत आणि सुरक्षा यंत्रणाही तुटपुंज्या आहेत. त्यामुळे पर्यटनासाठी येणाऱ्यांनी स्थानिक मार्गदर्शकांची मदत घेणे आवश्यक ठरते. जर शासनाने या परिसराचे पर्यटनस्थळ म्हणून नियोजनबद्ध विकास केला, तर हे ठिकाण गडचिरोलीसाठी उत्पन्नाचे नवे दालन ठरू शकते, असा विश्वास स्थानिक नागरिक व निसर्गप्रेमींनी व्यक्त केला आहे.
Comments are closed.