राज्यात दहा कोटी वृक्ष लागवड; हरित महाराष्ट्रासाठी लोकचळवळीचे आवाहन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई, ४ जून – “हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र” या अभियानांतर्गत राज्यात यंदा १० कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार असून, पुढील वर्षीही हेच उद्दिष्ट कायम राहणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आणि महाराष्ट्रातील वनाच्छदनाचे प्रमाण वाढवण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी या अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचे आवाहन केले. सह्याद्री अतिथीगृह येथे वृक्षारोपण मोहिमेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, वनमंत्री गणेश नाईक, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, मुख्य सचिव सुजाता सौनिक, अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, मागील वर्षांत ३३ कोटी व ५० कोटी वृक्ष लागवड करून राज्याने उल्लेखनीय प्रगती केली असून, यंदाचे १० कोटी वृक्षांचे उद्दिष्ट शक्य आहे. मात्र, यासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. रोपांची गुणवत्ता, त्यांचे वय (दिड ते तीन वर्षे), तसेच वृक्षांचे टिकाव आणि वाढ सुनिश्चित करणाऱ्या उपाययोजना यावर विशेष भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
ते पुढे म्हणाले की, वृक्ष लागवडीसाठी ‘कॅम्पा’ निधीचा प्रभावी वापर करावा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, रिमोट सेन्सिंग, उपग्रह इमेजिंग यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शक पद्धतीने संपूर्ण मोहिम राबवावी. दहा कोटी वृक्ष लागवड मोहिमेचे यश चांगल्या प्रतीची रोपे मिळण्यावर अवलंबून आहे, त्यामुळे राज्यात उत्कृष्ट नर्सरीज निर्माण करण्यावर भर द्यावा. महामार्ग, राज्य मार्ग तसेच पालखी मार्गाच्या कडेला झाडे लावण्याची जबाबदारी आता वन विभागाकडे सुपूर्त केली जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात वाढते उद्योगधंदे लक्षात घेता, पुढील वर्षी त्या जिल्ह्यात एक कोटी वृक्ष लागवड करण्याचा सरकारचा विचार असून लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. जोतिबा डोंगरावरही मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली जाईल, तर मराठवाड्यातील बीड, लातूर या कमी वनाच्छदन असलेल्या जिल्ह्यांमध्ये वन विभागाने स्वतंत्र मोहीम राबवावी, अशी सूचनाही त्यांनी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले की, महामार्गांच्या कडेला झाडे लावताना भविष्यातील रस्त्याच्या रुंदीकरणाचा विचार व्हावा. तसेच जांभूळ, बहावा, सुरंगी, पिंपळ, वड, कडुलिंब, अर्जुन यांसारखी देशी, सावली देणारी झाडे लावावीत. वृक्ष लागवड करताना प्रादेशिक हवामान, जमिनीचा प्रकार आणि स्थानिक वनस्पती यांचा अभ्यास करून रोपण करावे. वस्त्रोद्योग, पणन आदी विभागांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. वनमंत्री गणेश नाईक यांनी यावेळी सांगितले की, वृक्ष लागवडीसाठी ‘कॅम्पा’ निधीचा पूर्ण उपयोग करून ही मोहीम यशस्वी केली जाईल. महामार्गावर झाडे लावण्याची जबाबदारी वन विभाग पार पाडेल.pppppqq0q0
बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या वृक्ष लागवड व देखरेख प्रणालीचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाले. अँड्रॉईड आणि आयओएस प्लॅटफॉर्मवर चालणाऱ्या या अॅपद्वारे राज्यात करण्यात येणाऱ्या वृक्षारोपणाची माहिती संकलित होणार आहे. अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी या प्रणालीची माहिती दिली. या बैठकीदरम्यान विभागीय आयुक्त, जिल्हास्तरीय महसूल व वन विभाग अधिकारी हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होते. वृक्षारोपण म्हणजे केवळ झाडे लावणे नव्हे, तर ती वाढवणे, जपणे आणि पर्यावरणाचा समतोल राखणे हे एक दीर्घकालीन सामाजिक भान ठेवणारे पाऊल आहे, हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिपादनातून अधोरेखित झाले आहे..
Comments are closed.