Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जमिनीच्या वादातून सावत्र मुलाकडून महिलेवर प्राणघातक हल्ला; स्वराज्य फाउंडेशनच्या तत्परतेमुळे वाचले प्राण

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी, दि. ५ : अहेरी तालुक्यातील रामय्यापेठा येथे मंगळवारच्या रात्री एक मन हेलावणारी घटना घडली. जमिनीच्या पैशाच्या वादातून सावत्र मुलानेच आईवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र, स्वराज्य फाउंडेशनच्या वेळीच दाखवलेल्या तत्परतेमुळे पीडित महिलेचे प्राण वाचले.

पीडित महिला लालबाई पोचम आत्राम रात्री झोपेत असताना, त्यांचा सावत्र मुलगा इंदरशाही नामदेव मडावी याने घरात घुसून धारदार शस्त्राने वार केले. ही घटना मंगळवारी रात्री अंदाजे ११.३० वाजता घडली. या हल्ल्यात लालबाई गंभीर जखमी झाल्या. घटनेनंतर ग्रामस्थांनी तातडीने स्वराज्य फाउंडेशन, आलापल्ली येथील पदाधिकाऱ्यांना संपर्क करून मदतीची विनंती केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

फाउंडेशनचे कार्यकर्ते काही क्षणांतच त्यांच्या रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रथम जखमी महिलेची परिस्थिती पाहून अहेरी पोलिस ठाण्याशी संपर्क साधला, तसेच तत्काळ प्राथमिक उपचारासाठी अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

मात्र, जखम गंभीर असल्यामुळे लालबाई यांना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलवण्याची गरज निर्माण झाली. मात्र त्या वेळी रुग्णवाहिकेचा चालक अनुपस्थित असल्याने एक वेगळेच संकट निर्माण झाले. यावेळी अहेरी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक आगबतनवार यांनी अतिशय माणुसकीचे दर्शन घडवत स्वतः रुग्णवाहिका चालवून जखमी महिलेचा जीव वाचवला. या वेळी स्वराज्य फाउंडेशनचे प्रमुख आदर्श भाऊ केशनवार देखील त्यांच्या सोबत होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अहेरी ते चंद्रपूर हा अवघड प्रवास अत्यंत संयमाने आणि दक्षतेने पूर्ण करण्यात आला आणि लालबाई यांना वेळेत उपचार मिळवून देण्यात फाउंडेशन व पोलिसांचे मोलाचे योगदान ठरले.

या संपूर्ण घटनेमुळे स्वराज्य फाउंडेशनच्या सामाजिक भानासह, पोलिस प्रशासनातील मानवी मूल्यांचीही लक्षणीय दखल घेतली जात आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान आणि समाधानाचा सूर उमटला आहे.

यावेळी स्वराज्य फाउंडेशनचे प्रमुख आदर्श केशनवार, सदस्य अनिकेत निमलवार, आदित्य खरवडे, शिवम मुपिडवार यांचा सक्रियतेने सहभाग होता.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.