ट्रॅक्टर लावून नांगरलेला रस्ता मुख्यमंत्र्यांच्या रडारवर; वनपरिक्षेत्राधिकारी सुरपाम निलंबित
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली दि,१४ : आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ डी वरील तमनदाला फाटा ते अमडेली दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेला अवघा एक किलोमीटरचा रस्ता “वनकायद्याच्या उल्लंघनाचा” कारण पुढे करत वनविभागाने ट्रॅक्टर लावून चक्क नांगरून टाकला. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना कडक शब्दांत सुनावल्याने अखेर वनपरिक्षेत्राधिकारी सुधीर सुरपाम यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
सदर रस्ता स्थानिकांसाठी अत्यंत गरजेचा असून सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा प्रक्रिया पूर्ण करून जुलै २०२४ मध्ये रस्त्याचे काम सुरू केले होते. परंतु, वनविभागाने मंजुरी नाकारल्याने प्रस्ताव रखडला. नंतर कंत्राटदाराने आपल्या जबाबदारीवर गिट्टी टाकून रस्ता तयार केला. या रस्त्यावर ट्रॅक्टर चालवून त्याची माती करून टाकण्यात आली.
ही घटना समोर आल्यानंतर संबंधित कंत्राटदाराने सहपालकमंत्री अॅड. आशीष जयस्वाल यांची भेट घेतली. त्यानंतर जयस्वाल यांनी मुख्यमंत्र्यांना याची माहिती दिली. ६ जून रोजी गडचिरोली जिल्हा दौऱ्यात झालेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी या घटनेचा उल्लेख करत उपवनसंरक्षक पूनम पाटे यांना कठोर शब्दांत फटकारले. वनविभागाचा दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही, दोषी अधिकाऱ्याला घरी पाठवू, असा इशारा त्यांनी दिला.
या पार्श्वभूमीवर जयस्वाल यांनी सुरपाम यांच्यावर गुन्हा दाखल करून निलंबन करण्याची शिफारस केली होती. अखेर १३ जून रोजी मुख्य वनसंरक्षक एस. रमेशकुमार यांनी सुरपाम यांच्या निलंबनाचे आदेश दिले.
या प्रकारामुळे रस्ते, वीज, पाणी यांसारख्या मूलभूत सोयींसाठी लढणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडचणींना कारणीभूत ठरणाऱ्या वनविभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विकासकामांना विनाकारण अडथळा निर्माण करणाऱ्यांवर राज्य सरकार कारवाई करत असल्याचा स्पष्ट संदेश यानिमित्ताने गेला आहे.
Comments are closed.