गडचिरोली पोलिसांचा आंतरराज्य वाहनचोर टोळीवर मोठा घाव; 42 दुचाकींचा शोध, सात आरोपी कोठडीत
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, १७ जून : जिल्ह्यातील वाहन चोरीच्या गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेत गडचिरोली पोलिसांनी एक मोठी कारवाई करत आंतरराज्यीय वाहनचोर टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एकूण १६ लाख ५ हजार रुपये किमतीच्या तब्बल ४२ चोरीच्या दुचाकींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले असून सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांत सातत्याने वाढ होत असल्याचे निदर्शनास येत होते. यामुळे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. याच पार्श्वभूमीवर सावरगाव पोलीस मदत केंद्रात दि. ९ जून २०२५ रोजी विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करताना गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी विनयप्रकाश धरमु कुजुर (रा. गजामेंढी, ता. धानोरा) याला राजनांदगाव कारागृहातून ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली.
चौकशीत आरोपीने मोटरसायकल चोरीच्या अनेक गुन्ह्यांत स्वत:चा सहभाग असल्याची कबुली दिली. त्याने साथीदारांच्या मदतीने गाड्या चोरून त्यावर बनावट कागदपत्रे तयार केली जात असल्याचे उघड झाले. या टोळीमध्ये सहभागी असलेल्या इतर सहा आरोपींची नावेही तपासात निष्पन्न झाली आहेत. त्यानुसार रवनू दसरू पदा, राकेश छबीलाल बादले, रामु झिकटुराम धुर्वे (सर्व रा. गजामेंढी, ता. धानोरा), संजय मुन्ना लकडा, राजेंद्र चूंदा लकडा (दोघे रा. कवडू, जि. बलरामपूर, छत्तीसगड) व राजेश पुरुषोत्तम सोनकुसरे (रा. तळेगाव, ता. कुरखेडा) यांना अटक करण्यात आली आहे.
सदर आरोपींना न्यायालयात हजर केले असता २० जून २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस तपासातून सध्या गडचिरोली व छत्तीसगड येथील एकूण १४ गुन्ह्यांचा उलगडा झाला असून, यातून ४२ चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ही टोळी महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर सक्रिय होती आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहनांची विक्री करत होती. पुढील तपासात आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) सत्य साई कार्तिक, उपविभागीय पोलीस अधिकारी (धानोरा) रविंद्र भासले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थागुशाचे पोनि अरुण फेगडे, सपोनि भगतसिंग दुलत, सावरगावचे पोउपनि विश्वंभर कराळे, पोउपनि राजेंद्र कोळेकर, मपोउपनि सिध्देश्वरी राऊत व इतर कर्मचाऱ्यांच्या समन्वित प्रयत्नातून ही कारवाई फत्ते झाली.
गडचिरोली पोलिसांनी उचललेले हे पाऊल जिल्ह्यातील वाहनचोरीच्या घटनांना रोखण्यासाठी निर्णायक ठरू शकते, अशी प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे.
Comments are closed.