Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अहेरी प्रशासनाला नवे नेतृत्व; संजय आसवले यांनी स्वीकारला अपर जिल्हाधिकाऱ्यांचा पदभार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी २० जून: अहेरी उपविभागातील प्रशासनाला नव्या नेतृत्वाचा चेहरा मिळाला असून संजय दत्तात्रय आसवले यांनी १९ मे रोजी अहेरीचे नवीन अपर जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. मागील काही महिन्यांपासून प्रभारी अधिकाऱ्यांमार्फत चालवले जाणारे हे कार्यालय आता पूर्णवेळ अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली कार्यरत होणार आहे, ही बाब उपविभागासाठी सकारात्मक मानली जात आहे.

पूर्वीचे अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांची पदोन्नती होऊन त्यांची बदली भंडारा येथे झाली. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी प्रत्यक्ष अहेरीत राहून ‘ग्राउंड लेव्हल’वर काम केलं होतं. त्यांच्या बदलीनंतर तात्पुरता प्रभार उपविभागीय अधिकारी कुशल जैन यांच्याकडे देण्यात आला होता. आता संजय आसवले यांच्या रूपाने अहेरी प्रशासनाला पुन्हा एकदा पूर्णवेळ अधिकारी लाभला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

संजय आसवले हे मूळ कोल्हापूर जिल्ह्यातील असून २००४ मध्ये राधानगरी येथे नायब तहसीलदार म्हणून त्यांनी प्रशासकीय सेवेला सुरुवात केली. त्यानंतर सांगली, सोलापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये विविध पदांवर कार्यरत राहून त्यांनी अनुभव संपादन केला. सातारा येथे उपजिल्हाधिकारी असताना पदोन्नतीने त्यांची नियुक्ती अहेरी येथे झाली.

प्रशासकीय सेवेबरोबरच पत्रकारिता क्षेत्रातही संजय आसवले यांना सखोल अनुभव आहे. स्पर्धा परीक्षा देताना त्यांनी कोल्हापूर, बेडगाव, नाशिक येथील दैनिकांमध्ये उपसंपादक म्हणून कार्य केलं असून, लेखन व संवादकौशल्य त्यांचं बलस्थान राहिलं आहे. प्रशासनातील ही व्याप्ती त्यांचं नेतृत्व अधिक परिणामकारक ठरेल, अशी अपेक्षा आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अहेरी येथे २०१० मध्ये अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन झाल्यापासून आजवर १५ वर्षांच्या कालखंडात केवळ ६ पूर्णवेळ आणि तब्बल १३ प्रभारी अधिकाऱ्यांनीच कामकाज पाहिलं. परिणामी, स्थायित्वाचा अभाव आणि गतीशून्यता अशी परिस्थिती निर्माण झाली होती. विजय भाकरे यांच्या कार्यकाळात या कार्यपद्धतीत बदल दिसून आला. आता संजय आसवले यांच्याकडूनही अशीच आशा बाळगली जात आहे.

अहेरी उपविभागात अहेरी, एटापल्ली, भामरागड आणि सिरोंचा हे चार तालुके असून, या भागातील नागरिकांसाठी प्रशासनाशी थेट संवाद, त्वरित सेवा आणि ठोस निर्णय महत्त्वाचे मानले जातात. संजय आसवले यांच्या नेतृत्वात प्रशासन अधिक गतिमान व परिणामकारक होईल, अशी प्रतिक्रिया स्थानिक पातळीवर उमटत आहे.

Comments are closed.