Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

खत लिंकिंगचा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही; जिल्हाधिकाऱ्यांचा फौजदारी कारवाईचा इशारा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, १८ जुलै : जिल्ह्यात काही खत वितरकांनी शेतकऱ्यांकडून खत खरेदी करताना लिंकिंगच्या नावाखाली इतर वस्तू खरेदीची सक्ती केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी कडक पवित्रा घेत फौजदारी कारवाईचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. “खतविक्रीतील अशा पिळवणुकीचा प्रकार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही,” असा ठणकावाही त्यांनी यावेळी केला.

खत वितरणाच्या पारदर्शकतेसाठी जिल्हाधिकारी पंडा यांनी आज खत कंपन्यांचे प्रतिनिधी, मोठे व लहान वितरक यांच्यासोबत सविस्तर आढावा घेतला. बैठकीस अपर पोलीस अधीक्षक गोकूल, सहाय्यक जिल्हाधिकारी कुशल जैन, रणजित यादव, नमन गोयल व कृषी अधीक्षक प्रीती हिरळकर प्रमुख उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यासाठी मंजूर खत इतरत्र वळविल्यास जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला. खताची सध्याची मागणी लक्षात घेता, बफर स्टॉकमधून तातडीने पुरवठा करण्याचे आदेशही देण्यात आले. तसेच वितरकांनी कोणत्याही शेतकऱ्यावर इतर वस्तूंची सक्ती करू नये, अन्यथा गुन्हे दाखल केले जातील, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

खत वितरणासंदर्भात कंपन्यांनी खत रॅक आगाऊ नियोजनानुसार पाठवावेत आणि त्याबाबत प्रशासनास पूर्वसूचना द्यावी, अशाही सूचना बैठकीत देण्यात आल्या. जिल्ह्यात खताच्या काळाबाजाराविरोधात प्रशासन सजग असून, शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे खत सुलभपणे मिळावे यासाठी यंत्रणा कटिबद्ध असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.