Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कंत्राटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप, आरोग्य व्यवस्था ठप्प

गडचिरोलीत आरोग्य यंत्रणेवर ताण आला असून नियमित सेवेत समावेशाच्या मागणीसाठी १२०० कंत्राटी कर्मचारी बेमुदत संपावर आजपासून आहेत..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : राज्य शासनाने १४ मार्च २०२४ रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत समाविष्ट करण्याचा निर्णय कागदावर जाहीर केला; मात्र सव्वा वर्ष उलटूनही त्याची अंमलबजावणी न झाल्याने अखेर कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे.

गडचिरोली जिल्ह्यात तब्बल १२०० हून अधिक कर्मचारी या संपात उतरले असून, परिणामी जिल्ह्यातील रुग्णसेवा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे. नियमित समायोजना सोबतच मानधनवाढ, बदली धोरण, ईपीएफ व इन्शुरन्स सुविधा, तसेच कामाच्या अस्थिरतेवर तोडगा या मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी अनेकदा शासन दरबारी पाठपुरावा केला. ८ आणि १० जुलै रोजी आरोग्यमंत्र्यांना निवेदन सादर करूनही फक्त आश्वासनांचे खडेच मिळाल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी हा कठोर निर्णय घेतला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

संपात वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, समुपदेशक, लेखापाल, वॉर्डबॉय यांच्यासह जवळपास सर्वच श्रेणीतील कर्मचारी सहभागी झाले आहेत. संपाच्या काळात जिल्ह्यातील आरोग्य संस्थांतर्गत सर्व अहवाल सादर करणे बंद राहणार असून, लसीकरणाची ऑनलाईन आणि ऑफलाईन कामेही ठप्प होणार आहेत.

यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून जिल्हा रुग्णालयापर्यंत सर्वत्र कामकाजावर परिणाम झाला आहे. डेंग्यू आणि पावसामुळे वाढलेल्या साथरोगांच्या पार्श्वभूमीवर आधीच आरोग्य यंत्रणा तणावाखाली आहे. अशा वेळी या संपामुळे रुग्णांची गैरसोय गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र कोटगले यांनी सांगितले की, “मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही. रुग्णसेवा ठप्प होण्याची जबाबदारी संपूर्णपणे शासनावर राहील.” कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप दीर्घकाळ सुरू राहिला, तर ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेवर मोठा परिणाम होऊन रुग्णांचे प्राण धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

https://youtube.com/shorts/-TYJWEM2OIo?feature=share

 

Comments are closed.