धरती आबा अभियानातून गडचिरोलीच्या गावागावात विकास आराखड्यांना नवा वेग
केंद्र सरकारच्या जनजातीय कार्य मंत्रालयाच्या संचालक (TRI व मीडिया) दीपाली मसिरकर यांनी दोन दिवस जिल्ह्यात दौरा करून अंमलबजावणीचा घेतला आढावा...
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: आदिवासी समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी केंद्र सरकारने राबविलेल्या ‘धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला गडचिरोली जिल्ह्यात गती मिळत असून गावपातळीवरील विकास आराखड्यांना नवा वेग प्राप्त होतो आहे. “आदी कार्मयोगी” अभियानाच्या छत्राखाली सुरू असलेल्या या उपक्रमाचे प्रत्यक्ष निरीक्षण करण्यासाठी केंद्र सरकारच्या जनजातीय कार्य मंत्रालयाच्या संचालक (TRI व मीडिया) दीपाली मसिरकर यांनी दोन दिवस जिल्ह्यात दौरा करून अंमलबजावणीचा आढावा घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विशेष सभेत मसिरकर यांनी ग्रामविकास आराखडा, ग्रामपातळीवरील सेवा केंद्रे, तसेच स्थानिक गरजांनुसार राबविण्यात येणाऱ्या योजनांचा सखोल आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, सहाय्यक जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी कुशल जैन (अहेरी), रणजीत यादव (गडचिरोली) आणि अमर राऊत (भामरागड) यांच्यासह कार्मयोगी जिल्हा मास्टर ट्रेनर्स, ब्लॉक व व्हिलेज मास्टर ट्रेनर्स यांची प्रत्यक्ष आणि आभासी पद्धतीने बैठक घेण्यात आली.
या चर्चेत प्रत्येक गावात स्थानिक गरजांवर आधारित विकास आराखडे, आदी सेवा केंद्रांची स्थापना, तसेच विविध शासकीय योजनांचा एकात्मिक समन्वय साधून त्यांचा प्रभावी व व्यापक अंमल यावर भर देण्यात आला. “ग्रामपातळीवरील निर्णय प्रक्रियेत लोकांचा सहभाग वाढल्यास आदिवासी समाजाला शाश्वत विकासाची नवी दिशा मिळेल,” असे मत मसिरकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
सभेनंतर दीपाली मसिरकर यांनी काल आणि आज सावेला, कडीकट्टा, वडेगाव आणि पुराडा या गावांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांनी योजना कशा राबवल्या जात आहेत, लोकसहभाग कितपत आहे, याचा थेट आढावा घेतला. ग्रामपातळीवरील स्वयंसेवी संस्थांपासून स्थानिक प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत सर्वांशी संवाद साधत त्यांनी सुधारणा सुचविल्या.
या उपक्रमाद्वारे प्रत्येक गावासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार होणार असून पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण, रोजगार, शेती आणि पायाभूत सुविधा अशा महत्त्वाच्या क्षेत्रांतील गरजांना प्राधान्य दिले जाईल. शासनाच्या विविध योजनांचा एकत्रित व समन्वयित लाभ आदिवासी समाजाला मिळावा हा संपूर्ण अभियानाचा गाभा असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्हा प्रशासनाच्या मते, “धरती आबा” अभियानामुळे गडचिरोलीतील आदिवासी भागांमध्ये आर्थिक सक्षमीकरण, शिक्षणाची घसरणारी पातळी थांबविणे आणि आरोग्य सुविधा पोहोचविणे या दिशेने सकारात्मक बदल घडतील. गावकुसातील प्रत्येक कुटुंबाचा सहभाग सुनिश्चित करून खऱ्या अर्थाने “ग्राम उत्कर्ष” साध्य करण्यासाठी हा उपक्रम नवा आदर्श ठरू शकेल, असा विश्वास जिल्हाधिकारी पंडा यांनी व्यक्त केला.