आमदार धर्मराव बाबा आत्रामांचा जयस्वालांवर गंभीर आरोप
“विकासकामात हस्तक्षेप, अधिकाऱ्यांवर दबाव असह्य” — धर्मराव बाबा आत्राम...
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. ११ : गडचिरोलीत महायुतीत नवा राजकीय तणाव निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली आहे. आत्राम म्हणाले, “ते फक्त विकासकामे नाही तर प्रशासनावरही दबाव आणत आहेत. माझ्या मतदारसंघात अशा हस्तक्षेपाला मी कधीही परवानगी देणार नाही.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारल्यानंतर जयस्वाल यांची सहपालकमंत्री म्हणून नियुक्ती झाली. या नेत्याच्या उपस्थितीत प्रलंबित कामे मार्गी लागतील, अशी अपेक्षा होती. परंतु, गेल्या वर्षभरातच जिल्ह्यातील विकासकामे आणि निधीच्या वाटपावर जयस्वालांचा हस्तक्षेप वाढल्याचे संकेत मिळाले आहेत.
सुरुवातीला भाजपमधील काही नेत्यांनी त्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली होती, आणि आता राष्ट्रवादी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी या तणावाला सार्वजनिक रूप दिले आहे.
आत्राम म्हणाले, “जयस्वाल यांनी खनिज निधी आणि जिल्हा नियोजन समितीतील वाटपात हस्तक्षेप सुरू केले आहे. अधिकाऱ्यांनाही ते आदेश देतात. मी आठ वेळा विधानसभा निवडणूक लढवलेलो आणि मंत्रीपद भूषवलेलो जनप्रतिनिधी आहे. तरीही माझ्या मतदारसंघात अशा हस्तक्षेपाला मी कधीही खपवून घेतले जाणार नाही. जर विकासकामांच्या समस्यांवर लक्ष दिले तर हे प्रश्न मार्गी लागतील,” असा इशारा त्यांनी दिला.
नागपूरचा हस्तक्षेप आणि स्थानिक राजकारणातील दबाव….
धर्मराव आत्राम यांनी सांगितले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारल्यानंतर नागपूरच्या नेत्यांचा हस्तक्षेप वाढला आहे. काही नेत्यांनी खनिज निधी आणि इतर विकास निधीत वाटा मागण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्रे दिली, तर बाहेरील कंत्राटदारांनी वरिष्ठ नेत्यांची नावे उचलून दबाव आणल्याचे चित्र दिसले.
यामुळे गडचिरोलीतील महायुतीतील स्थानिक नेत्यांमध्ये असंतोष वाढले आहे. आत्राम यांनी स्पष्ट केले की, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत हा हस्तक्षेप महायुतीवर परिणाम करेल.
राजकीय समीकरणांचा हा तणाव फक्त राजकीय पक्षांमध्येच नाही, तर प्रशासनातील अधिकाऱ्यांवर होणाऱ्या दबावातूनही स्पष्ट दिसत आहे. स्थानिक नेते असंतोषातून मैदानात उतरले आहेत, तर बाहेरील दबावाचे परिणाम आता आगामी निवडणुकीत दिसू शकतात.