Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महायुतीत संवाद, नसेल तर भाजप स्वबळावर लढणार; आमदार धर्मराव बाबा आत्राम यांना भाजप कडून प्रत्युत्तर …

भाजपा कडून अर्जांची छाननी करून लोकांची पसंती, निवडून येण्याची क्षमता यावर भर असून त्या बाबत सर्व्हेक्षण केले जाईल. त्यानंतर लोकांच्या मनातील उमेदवार निश्चित केला जाईल, असे प्रा.बारसागडे म्हणाले....

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीतील घटक पक्षांसोबत एकत्र लढायचे की स्वबळावर — याबाबतचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आम्हाला वरिष्ठांकडून मिळाले आहे. त्यामुळे महायुतीतील प्रमुख पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यासमोर औपचारिक युतीचा प्रस्ताव ठेवण्याचे ठरवले आहे. मात्र, योग्य प्रतिसाद न मिळाल्यास भाजप स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरेल, अशी भूमिका जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली.

या पत्रकार परिषदेत पक्षाचे राष्ट्रीय महामंत्री (अनुसूचित जनजाती मोर्चा) व माजी खासदार अशोक नेते, आमदार डॉ. मिलींद नरोटे, माजी आमदार डॉ. देवराव होळी, डॉ. नामदेव उसेंडी, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, जिल्हा महामंत्री गीता हिंगे, प्रदेश प्रतिनिधी रविंद्र ओल्लालवार, अनिल पोहणकर व अनिल तिडके यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

प्रा. बारसागडे यांनी स्पष्ट केले की, “भाजपमध्ये कोणालाही थेट उमेदवारी दिली जाणार नाही. कोणाची उमेदवारी पक्की आहे असे कोणी समजू नये. नगर परिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी इच्छुकांनी २५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज सादर करावेत. अर्जांचे सर्वेक्षण, उमेदवाराचा जनाधार आणि कार्यक्षमता पाहून अंतिम उमेदवार निश्चित करण्यात येईल.”

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे नेते आ. धर्मरावबाबा आत्राम यांनीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढविण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे यावेळी भाजप आणि राष्ट्रवादी (एपी)मध्ये थेट सामना होण्याची शक्यता वाढली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

युतीधर्म आम्ही पाळला, पण”…..

प्रा. बारसागडे म्हणाले, “विधानसभा निवडणुकीत धर्मरावबाबा आत्राम यांना उमेदवारी मिळाल्यानंतर भाजपने पूर्ण ताकदीने त्यांच्यासाठी काम केले. त्यांच्या विजयात भाजपचे योगदान स्पष्ट आहे. मात्र, त्यांनी चामोर्शीतील मेळाव्यात भाजपवर टीका करून ‘भाजपला तुकडाही मिळू देणार नाही’ असे विधान केले, हे खेदजनक आहे.”

२०१७ च्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये भाजपने जिल्हा परिषद आणि अनेक नगर परिषदांवर स्वबळावर सत्ता स्थापल्याची आठवण करून देत त्यांनी प्रश्न उपस्थित केला — “ज्या पक्षाने जिल्ह्यात सत्ता स्थापली, तोच ‘तुकड्याची भाषा’ का करतो?”

शेवटी त्यांनी म्हटलं, “भाजप युतीधर्माचा आदर राखत संवादासाठी सज्ज आहे; पण जर चर्चेतून ठोस निर्णय झाला नाही, तर सर्व जागांवर आम्ही स्वबळावर लढण्यास तयार आहोत.”

Leave A Reply

Your email address will not be published.