Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोलीत काँग्रेसचा शक्तिप्रदर्शन मेळावा; शेकडो कार्यकर्त्यांचा भव्य प्रवेश, भाजपला धक्का

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. २७ ऑक्टोबर :

गडचिरोली जिल्ह्याच्या राजकीय समीकरणांना नव्या दिशा देणारा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाला नवी उभारी देणारा भव्य कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश सोहळा आज गडचिरोली येथे उत्साहात पार पडला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धनदादा सपकाळ आणि काँग्रेस विधिमंडळ गटनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात जिल्ह्याचा राजकीय नकाशा नव्याने रंगला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सभागृहात लवकरच निवडणुकांचा सुगंध जाणवू लागला होता. या मेळाव्यात काँग्रेस कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह, ढोलताशांचा गजर आणि “विकासासाठी काँग्रेस” या घोषणांनी वातावरण भारावले होते.

प्रमुख नेत्यांची उपस्थिती…

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या सोहळ्यास पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजीत वंजारी, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम, जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रदेश सचिव संदेश सिंगलकर, शकूर नागाणी, पंकज गुड्डेवार, रवींद्र दरेकर, संतोषसिंह रावत, तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व प्रदेश सचिव अजय कंकडवार, माजी जि.प. सदस्य ॲड. राम मेश्राम, माजी उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, शहर काँग्रेस अध्यक्ष सतीश विधाते, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव ऍड. विश्वजीत कोवासे आणि समशेरखान पठाण यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुका व सेल अध्यक्ष, असंख्य पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रवादी, शिवसेनेतून काँग्रेसमध्ये मोठा प्रवेश…

या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे जिल्ह्याच्या राजकारणात वजनदार मानल्या जाणाऱ्या अनेक नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाचे) गडचिरोली नगरपरिषदेचे पहिले नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार, कविताताई पोरेड्डीवार, माजी नगरपरिषद सभापती विजय गोरडवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा हर्षलता येलमुले, माजी जि.प. सदस्य लालसुजी पुंगाटी, तसेच शिवसेनेचे गजानन नैताम यांच्यासह अनेक माजी नगरसेवक, त्यांचे सहकारी आणि कार्यकर्त्यांनी शेकडोंच्या संख्येने काँग्रेसचा झेंडा हाती घेतला.

या प्रवेशामुळे काँग्रेसचा जनाधार वाढत असल्याचे चित्र स्पष्ट दिसले. या नव्या शक्तीमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष अधिक बळकट होणार असल्याचा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.

नेतृत्वाचा आत्मविश्वास आणि कार्यकर्त्यांचा उत्साह…

कार्यक्रमात बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले, “काँग्रेस ही केवळ पक्ष नाही, तर जनतेच्या न्यायासाठी लढणारी चळवळ आहे. गडचिरोली जिल्ह्याने नेहमी प्रामाणिक नेतृत्व दिले आहे. आजच्या पक्षप्रवेशाने या लढाईला नवा जोश मिळाला आहे.”

 

तर विजय वडेट्टीवार म्हणाले, “राज्यातील अन्याय, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांविरुद्ध काँग्रेस ठामपणे लढणार आहे. गडचिरोलीतील या नव्या उर्जेमुळे परिवर्तन निश्चित आहे.”

जिल्ह्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चाहूल…

या पक्षप्रवेशामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चाहूल लागली आहे. जिल्ह्यातील काँग्रेसला केवळ संघटनात्मकच नव्हे, तर सामाजिक व भौगोलिक स्तरावरही बळकटी मिळणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जवळ आल्या असताना हा प्रवेश पक्षासाठी निर्णायक ठरेल, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.