Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कापुर झाडाच्या वाइरल पोस्ट बद्दल एक सत्य पडताळणी

- डॉ. हर्षद दिवेकर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

 

सध्या ‘कापुराच्या झाडा’ बद्दलची एक पोस्ट व्हॉटसऍप विद्यापीठात धुमाकूळ घालते आहे. यात कापुराच्या झाडाचं रसभरीत वर्णन केलेलं आहे. हे झाड कसं आपल्या पर्यावरणासाठी अत्यंत उपकारक आहे हे सांगितलं आहे. तसंच ब्रिटिशांनी चहा-रबराच्या लागवडीसाठी कशी या झाडांची कत्तल केली आणि आपण भारतीयच किती करंटे आहोत की आपण केवळ स्वार्थासाठी हे घडू दिलं असा इतिहासही सांगितला आहे. या सगळ्याचा कळस म्हणजे पोस्टवर विज्ञानाची मस्त चमचमीत फोडणी मारली आहे. एवढं सगळं केल्यावर पोस्ट आकर्षक आणि वाचनीय झाली नसती तरच नवल ! सध्या निसर्ग-पर्यावरण हा खूप संवेदनशील विषय झालेला असल्याने त्याबद्दल काहीही नवीन माहिती आली की त्यावर निसर्गप्रेमी वाचकांच्या उड्या पडतात. तसंच, ‘उचललं बोट आणि लावलं फॉरवर्ड ऑप्शन ला’ या व्हॉटसऍप विद्यापीठाच्या पहिल्या व महत्त्वाच्या नियमानुसार अशी माहिती वणव्यापेक्षाही अधिक वेगाने पसरते. त्यामुळे या पोस्टमध्ये किती तथ्य आहे हे सांगण्यासाठी ही पोस्ट लिहीत आहे.

१) पोस्टमधील पहिला दावा असा की कापुराचे झाड आजूबाजूच्या किमान अर्धा किलोमीटर रेडियसमधील हवा शुद्ध करते. पण या दाव्याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. सर्वच झाडे कमीजास्त प्रमाणात हवा शुद्ध करतात. झाडांच्या पानात असलेले हरितद्रव्य, पानांनी शोषून घेतलेला कार्बनडाय ऑक्साईड आणि सूर्यप्रकाश यांच्या साहाय्याने झाडे प्रकाशसंश्लेषण क्रिया करतात आणि स्वतःचे अन्न तयार करतात. या प्रक्रियेत निर्माण होणारा ऑक्सिजन वातावरणात मुक्त होतो. याचाच अर्थ असा की जेवढे झाड मोठे तेवढी त्याच्या पानांची संख्या अधिक, तेवढे त्याचे प्रकाशसंश्लेषण अधिक आणि तेवढी त्याची कार्बनडाय ऑक्साईड शोषण्याची व ऑक्सिजन सोडण्याची क्षमता अधिक. कापुराचे झाड आकाराने खूप मोठे होत असल्याने ते मोठ्या प्रमाणात ही वायूंची देवाणघेवाण करणार हे साहजिक आहे. पण तेच काम त्याच्यासारख्याच मोठ्या आकाराचे भारतीय वृक्ष सुद्धा करतात. कापुराच्या झाडाचा हा काही विशेष गुणधर्म नाही.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दुसरी गोष्ट अशी की या झाडात कापुराचा अंश असला तरी हे झाड हवेत कापुराचा काही अंश सोडून हवा शुद्ध वगैरे करत नाही. या झाडापासून कापूर वेगळा करण्यासाठी त्याच्या खोडाच्या तुकड्यांचे ऊर्ध्वपातन (distillation) करून त्यापासून कापूर वेगळा करावा लागतो. या कापुरामध्ये काही प्रमाणात अँटिबायोटिक (प्रतिजैविक), अँटीफंगल (बुरशीनाशक), कीटक परावर्तक (insect repellent) गुणधर्म असतात असे दिसून आले असले तरी कापूर जाळल्यावर खरोखरच हवा शुद्ध होते का हा अजूनही वादग्रस्त मुद्दा आहे. असे असताना कापुराचे झाड हवेत कापुराची वाफ सोडून हवेतील जीवाणू, विषाणूंचा नाश करते असं समजणं फार भाबडेपणाचं आहे. खरी गोष्ट अशी की ऑस्ट्रेलिया देशात लागवड केलेल्या कापुराच्या झाडावर काही किडे व्यवस्थित वाढतात आणि झाडाला पोखरतात. त्यामुळे कापुराचे झाड आजूबाजूच्या अर्धा किलोमीटर परिसरातील हवा शुद्ध करते हा दावा पूर्ण खोटा आहे.

२) ब्रिटिशांनी आपल्या फायद्यासाठी कापुराची झाडे तोडून तिथे चहा-रबराची शेती केली हा पोस्टमधील दावाही खोटा आहे. ‘हे झाड भारतातून जवळपास नाहीसं होण्याच्या मार्गावर आहे आणि त्याची लागवड करून आपण त्याला नामशेष होण्यापासून वाचवूया व त्याचं पुनरुज्जीवन करूया’ असं सांगून पोस्टकर्त्याने हे भासविण्याचा प्रयत्न केलाय की हे भारतीय स्वदेशी झाड असून माणसाच्या चुकीच्या वागण्यामुळे त्यावर संक्रांत आली आहे. पण ते खरं नाही. कापुराचं झाड हे मूळचं चीन, जपान, कोरिया, व्हिएतनाम इथलं आहे. भारतातील हिंदू, जैन, बौद्ध समाजात धार्मिक विधींसाठी व औषधे बनविण्यासाठी प्राचीन काळापासून कापुराचा वापर होत असला तरी त्याचे उत्पादन भारतात होत असल्याचा कुठलाही उल्लेख सापडत नाही. आयुर्वेदात Cinnamomum camphora या झाडापासून मिळणाऱ्या कापुराला ‘पक्व कापूर’, तर Dryobalanops aromatica या झाडापासून मिळणाऱ्या कापुराला ‘अपक्व कापूर’ (कापूर तेल) म्हणतात. पण ही दोन्ही झाडं भारतीय नाहीत किंवा त्यांच्या व्यावसायिक लागवडीचे उल्लेखही कुठे नाहीत. श्रीलंकेच्या जंगलात कापुराचा अंश असलेले Cinnamomum capparu coronde आणि आपल्या केरळ राज्यातील पश्चिम घाटात Cinnamomum agasthymalaynam या दोन स्थानिक जाती सापडलेल्या आहेत. परंतु अजून त्यापासून कापूर वेगळा करण्याची प्रक्रिया विकसित झालेली नाही. प्राचीन काळापासून भारताचे चीन, आग्नेय आशिया येथील देशांशी व्यापारी संबंध असल्याने कापूर तिथून आयात केला जायचा. अगदी अलीकडच्या काळात दक्षिण भारतात आणि उत्तर भारतातील सहराणपूर, देहराडून व कलकत्ता येथे कापुराच्या झाडांची थोडीफार लागवड झाली आहे. पण त्यातून व्यावसायिक उत्पादन फारसे होत नाही.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

३) पोस्टमधील शेवटचा दावा असा की आपण आजकाल पूजेला जो कापूर वापरतो तो खरा कापूर नाही. खरा कापूर म्हणजे भीमसेनी कापूर जो या झाडापासून मिळतो. पण खरी गोष्ट अशी की ज्याला खोटा किंवा कृत्रिम कापूर म्हंटलं जातं तो कापूरही झाडापासूनच बनवितात. पाईन सारख्या सूचीपर्णी वृक्षांच्या डिंकाचे ऊर्ध्वपातन करून त्यापासून टरपेंटाईन तेल मिळवितात आणि या तेलातील अल्फा-पायनीन या रसायनापासून कापूर बनवितात. हा कापूर आणि भीमसेनी कापूर यांचे रासायनिक सूत्र C10 H16 O हे एकच आहे. फक्त त्याच्या रासायनिक संरचनेत थोडाफार बदल आहे. पण भीमसेनी कापूर जाळल्यास हवा शुद्ध करतो व अन्य कापूर जाळल्यास तो घातक परिणाम करतो याला पुरेसा वैज्ञानिक आधार नाही. सत्य असे की कोणतीही वस्तू जाळून हवा शुद्ध होतच नसते.

पोस्टमधील असत्यता पाहिल्यावर आता आपण कापुराची रोपे भारतात लावावीत की नाही याची चर्चा करूया. कापुराचे झाड हे चीन,जपान इथलं स्थानिक असलं तरी जगात खूप ठिकाणी त्याची लागवड झालेली आहे आणि जिथे जिथे ते लावलं त्या त्या ठिकाणी त्याचे स्थानिक पर्यावरणावर घातक दुष्परिणाम दिसून आलेले आहेत. या झाडाला येणारी बेरीसारखी फळे पक्षी आवडीने खातात आणि त्यांच्या विष्टेतून या फळांच्या बिया दूरवर पसरतात. याच्या बियांची रुजवण क्षमता खूप असल्याने व दुष्काळात चिवटपणे तग धरण्याच्या क्षमतेमुळे वर्षावने, दलदली, शुष्क माळराने इथे ही वनस्पती झपाट्याने फोफावते आणि स्थानिक वनस्पतींसाठी घातक स्पर्धा निर्माण करते. ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेतील राज्यात लागवड केलेल्या कापुराच्या झाडांनी तिथल्या वनजमिनीवर एवढी घुसखोरी केलेली आहे की त्यांनी आता त्याला invasive species घोषित करून त्याच्या लागवडीवर बंदी घातली आहे. ही झाडे ऑस्ट्रेलियातील कोआला या प्राण्याचे एकमेव खाद्य असलेल्या स्थानिक निलगिरीच्या चिवट झाडांशीही तीव्र स्पर्धा करतात.

कापुराच्या झाडाचा दुसरा मोठा धोका म्हणजे त्याचा अन्य झाडांच्या रुजवण क्षमतेवर होणारा दुष्परिणाम. झाडांनी विशिष्ट रसायने तयार करून अन्य झाडांच्या रुजवण क्षमतेवर परिणाम करण्याच्या या क्रियेला वनस्पतीशास्त्रात ऍलिलोपॅथी (Allelopathy) अशी संज्ञा आहे. कापुराच्या झाडाच्या पानांमध्ये कापुराचा अंश असतो. जेव्हा या झाडाची पानगळ होते तेव्हा जमिनीवर पडलेली पाने कुजताना त्यातील कापूर जमिनीत मिसळतो आणि अन्य झाडांच्या बियांची रुजवण क्षमता संपवितो किंवा कमी करतो. हाच कापूर मातीतील काही उपयुक्त बुरशी देखील नष्ट करतो किंवा त्याचे प्रमाण घटवितो. एका संशोधनात असे दिसून आले आहे की किमान ५२ प्रकारच्या झाडांच्या बिया व २७ प्रकारच्या बुरशी यांच्यावर कापुराचा घातक दुष्परिणाम होतो. हा कापूर पावसाच्या पाण्याबरोबर जमिनीत मुरून नैसर्गिक जलस्त्रोतातही मिसळू शकतो. थोडक्यात काय तर आपल्या आजूबाजूला असलेली स्पर्धा कमी करण्यासाठी कापुराचे झाड हे रासायनिक हत्यार वापरते ज्याचा स्थानिक परिसंस्थेवर घातक परिणाम करते.

वरील विवेचनावरून असे लक्षात येईल की कापुराचे झाड भारतीय नसून त्याची इथे लागवड केल्यास त्याचे स्थानिक परिसंस्थेवर वाईट परिणाम होतील हे उघड आहे. पण व्हॉटसऍपवर सध्या फिरणारी पोस्ट या झाडाची प्रचंड भलामण करते आहे. अर्थात, ते काही रोपवाटिका चालकांचं मार्केटिंग तंत्र आहे. त्यासाठी त्यांनी कापुराच्या झाडाचं तोंडभरून कौतुक केलं आहे, हे झाड स्वदेशी आहे असं नकळतपणे भासवलं आहे, ब्रिटिशांनी कशी याची कत्तल केली हे सांगून त्यांच्यावर बिल फाडलं आहे, पुन्हा आपण भारतीय कसे ब्रिटिशांच्या जाळ्यात फसलो हे भासवून निसर्गप्रेमींच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण करण्याचा व सर्वांना भावनिक करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि पुरेशी वातावरण निर्मिती होईल याची खात्री झाल्यावर हळूच रोपांच्या किंमती, ते मिळण्याची ठिकाणं, तुम्हाला रोपं तुमच्या भागात उपलब्ध करून देण्याची सोय, त्यासाठी नेमलेल्या व्यक्ती, त्यांचे मोबाईल नंबर असे तपशील पोस्टमध्ये घुसवलेत. निसर्गप्रेमींनी हा कावा वेळीच ओळखण्याची गरज आहे. ‘ज्ञानवर्धक’ पोस्टच्या वेष्टनातून एक ‘व्यवसायिक जाहिरात’ सर्वांच्या माथी मारली जात आहे.

मी तमाम निसर्गप्रेमींना कळकळीची विनंती आणि आवाहन करतो की कृपया अशा फसव्या पोस्ट्सना बळी पडून आपल्या स्थानिक निसर्गाचं वाटोळं होईल असं काही करू नका. एकदा एखाद्या घुसखोर विदेशी वनस्पतीच्या किंवा प्राण्याच्या प्रजातीचा फैलाव आपल्या देशात झाला की नंतर ती घुसखोर प्रजात आवरता आवरत नाही. येडी बाभळ, टणटणी अशी काही उदाहरणे आपल्यासमोर आहेत. त्यात आता आणखी भर नको. त्यामुळे सोशल मीडियावरील अशा पोस्टवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका आणि त्या पोस्ट व्हायरलही करू नका. प्रत्येक निसर्गप्रेमी व्यक्तीने एवढे तारतम्य बाळगल्यास आपण ही जैविक घुसखोरी थांबवू शकू.

 

  • डॉ. हर्षद दिवेकर
    नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी, सांगली.

 

हे देखील वाचा : 

मानसिक रुग्णांच्या मेंदूतील देश..!

शेतकरी संघटनेला गवसलेले अनमोल रत्न : ऍड वामनराव चटप

Comments are closed.