कौशल्याधिष्ठित शिक्षणातून पदवी आणि रोजगाराचा मार्ग — ‘विद्यापीठ आपल्या गावात’ उपक्रमाला विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली,१५ जून :“विद्यापीठ आपल्या गावात” या गोंडवाना विद्यापीठाच्या नाविन्यपूर्ण आणि जनसामान्यांपर्यंत पोहोचणाऱ्या उपक्रमामुळे उच्च शिक्षणापासून दूर गेलेले, सामाजिक-आर्थिक अडचणींमुळे महाविद्यालयापर्यंत पोहोचू न शकलेले अनेक युवक आता शिक्षणाच्या प्रवाहात पुन्हा सामील होत आहेत. विशेषतः अशा विद्यार्थ्यांना केवळ पदवीच नव्हे, तर रोजगाराभिमुख कौशल्यांचे प्रशिक्षण मिळत असल्यामुळे त्यांचे आयुष्य नव्याने आकार घेऊ लागले आहे.
जांभळी या दुर्गम आदिवासी गावातून २०२३ मध्ये सुरू झालेल्या “विद्यापीठ आपल्या गावात” या उपक्रमाचा नुकताच आढावा घेण्यासाठी गोंडवाना विद्यापीठाचे आदर्श पदवी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्याम खंडारे आणि या उपक्रमाचे समन्वयक डॉ. महेंद्र वर्धलवार यांनी संध्याकाळी गावाला भेट दिली. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. खंडारे यांनी स्पष्टपणे सांगितले की, “आजचे शिक्षण हे केवळ पुस्तकी राहिले नसून, बांबू क्राफ्ट, वनउपज प्रक्रिया, जंगल व्यवस्थापन, आदिवासी अर्थव्यवस्था यांसारख्या स्थानिक जीवनाशी निगडित विषयांचे ज्ञान आता अभ्यासक्रमाचा भाग झाले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना केवळ बी.ए. पदवी मिळत नाही, तर त्यासोबतच स्थानिक स्तरावर उपलब्ध असलेल्या संसाधनांवर आधारित रोजगार संधी देखील खुल्या होतात.”
खेड्यांतील अनेक युवक शेतमजुरी, बांबू संकलन, जंगलातून उत्पन्न घेणाऱ्या उपजांच्या प्रक्रियेत काम करत असतात. दिवसभर काम करून संध्याकाळी अभ्यासासाठी वर्गात येणाऱ्या या विद्यार्थ्यांचा उत्साह आणि जिद्द पाहून विद्यापीठ प्रशासनही प्रभावित झाले आहे. डॉ. खंडारे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना उद्देशून म्हटले की, “तुमची मेहनत वाया जाणार नाही. शिक्षण आणि कौशल्याचा संगम तुमच्या जीवनाला दिशा देईल. याच माध्यमातून तुम्ही नोकरी, स्वयंरोजगार आणि उद्योजकतेच्या दिशेने पावले टाकू शकता.”
‘विद्यापीठ आपल्या गावात’ या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून, आता त्यांना गाव सोडून शहरात जाऊन शिकावे लागणार नाही, ही मोठी सोय झाली आहे. स्थानिक स्तरावर विद्यापीठ शिक्षण आणि त्यासोबत जोडलेले व्यावहारिक कौशल्य यामुळे ‘गावात शिक्षण, गावात रोजगार आणि गावातच विकास’ ही संकल्पना मूर्त रूप घेत असल्याचे चित्र पाहायला मिळते.
या वेळी जांभळी गावातील ‘विद्यापीठ आपल्या गावात’ उपक्रमांतर्गत शिकणारे विद्यार्थी, ग्रामस्थ, स्वयंसेवी संस्था कार्यकर्ते आणि शिक्षक उपस्थित होते. उपक्रमाच्या यशस्वीतेबाबत समाधान व्यक्त करत डॉ. वर्धलवार यांनी सांगितले की, “हा उपक्रम केवळ शिक्षण पोहोचवण्यापुरता मर्यादित नाही, तर तो ग्रामीण परिवर्तनाची बीजे रुजवणारा आहे. याचे परिणाम पुढील काही वर्षांत आणखी स्पष्टपणे दिसून येतील.”
गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा प्रयोग आज एका सामाजिक शिक्षण चळवळीचे रूप धारण करत आहे. राज्यातील इतर विद्यापीठांनीही या प्रयोगातून प्रेरणा घेऊन शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण युवकांना स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग दाखवावा, अशी अपेक्षा अनेक मान्यवरांनी व्यक्त केली आहे.
Comments are closed.