Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अहेरी प्रकल्पातील 272 शिक्षकांची होणार क्षमता चाचणी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

अहेरी, 13 सप्टेंबर : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी अंतर्गत शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक यांची रविवार दिनांक 17 सप्टेंबर 2023 ला ‘शिक्षक क्षमता चाचणी’ घेण्यात येणार आहे. यापूर्वी मागील वर्षी व यावर्षी सुद्धा विध्यार्थी क्षमता चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये विद्यार्थ्यांची क्षमता निश्चिती करून शिक्षकांकडून अध्यापनाचे नियोजन करण्यात आले. मागील चाचणी पेक्षा या चाचणीत विद्यार्थ्यांची प्रगती झाल्याचे दिसून आले. शैक्षणिक सत्र 2023-24 मध्ये अहेरी प्रकल्पांतर्गत विद्यार्थी केंद्रित विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शिक्षकांचा व विद्यार्थ्यांचा अध्ययन-अध्यापनात उत्साह वाढावा यासाठी 30 जून रोजी शाळेचा पहिला दिवस हा प्रवेशोत्सव म्हणून साजरा करण्यात आला.

पाहिल्या पंधरवड्यात शाळेत विविध उपक्रम घेण्यात आले. त्यामुळे शाळेची उपस्थिती व शैक्षणिक प्रगतीत वेग आल्याचे दिसून येते. तसेच शासकिय व अनुदानित आश्रम शाळेतील सर्व शिक्षकांचे भविष्यवेधी शिक्षण विचार प्रणालीचे प्रशिक्षण घेण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या गुणवत्तेत वाढ होण्यास मदत झाली. तसेच सर्व उच्च माध्यमिक शिक्षकांचे विषयवार प्रशिक्षण सुद्धा अहेरी प्रकल्पांतर्गत देण्यात आलेले आहे. प्रकल्पस्तरावर शैक्षणिक गुणवत्ता कक्षामार्फत दरमहा प्राथमिक शिक्षकांचे एकदिवसीय EduFest चे आयोजन करून त्यामध्ये विविध विषयांवर विषयमित्र कडून मार्गदर्शन केले जाते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सहायक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे यांच्या कल्पनेतून सर्व आश्रम शाळेतील इयत्ता 5 वीत शिकत असलेल्या 224 विद्यार्थ्यांची नवोदय चाळणी परीक्षा घेऊन त्यामधून 42 विद्यार्थ्यांची निवड करून त्यांचे विशेष वर्ग शासकीय आश्रम शाळा, खमणचेरू येथे सुरू करण्यात आलेले आहे. तसेच इयत्ता 11 वी व 12 वी ,मधील विज्ञान शाखेतील 448 विद्यार्थ्यांचे JEE व NEET परीक्षेच्या तयारी करिता चाळणी परीक्षा घेण्यात आली व त्यामधून 35 विद्यार्थ्यांची निवड करून त्याना एकलव्य रेसिडेंशील स्कुल, अहेरी येथे विशेष शिकवणी वर्ग सुरू करणेबाबत नियोजन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांच्या मूलभूत क्षमता विकसित करण्यासाठी शिक्षक परीक्षाभिमुख विचारशैलीचा असावा याबाबत सहायक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे आग्रही आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षमतांचा विकास घडवून यावा व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे याकरिता शिक्षक अद्ययावत असणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच अहेरी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या 272 शिक्षकांचे शिक्षक क्षमता चाचणी दि. 17 सप्टेंबर 2023 रोजी घेण्यात येणार असल्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी वैभव वाघमारे यांनी कळविले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Comments are closed.