छत्तीसगडहून आलेल्या दोन तस्कर हत्तींचा गडचिरोली जिल्ह्यात धुमाकूळ..
गावांमध्येही प्रवेश, शेतपिकांचे मोठे नुकसान – नागरिकांत भीती व रोषाचे वातावरण..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा एकदा रानटी तस्कर हत्तींचा धुमाकूळ सुरू झाला आहे. छत्तीसगडच्या सीमेलगतच्या जंगलातून आलेल्या दोन टस्कर हत्तींनी मागील चार दिवसांपासून गडचिरोली, आरमोरी, पूराडा व पोरला परिसरात अक्षरशः थैमान घातले आहे. या हत्तींच्या आगमनामुळे शेतपिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, हे हत्ती आता चक्क गावांमध्ये प्रवेश करू लागल्याने जनजीवनही विस्कळीत झाले आहे.
छत्तीसगड राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात आलेल्या दोन तस्कर हत्तींच्या उपस्थितीमुळे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये भीतीचे व अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. चार दिवसांपासून ही टस्कर जोडी आरमोरी, पूराडा, पोरला आणि गडचिरोली वनक्षेत्रात फिरत असून, त्यांनी अनेक शेतकऱ्यांची उभी पिके तुडवून नष्ट केली आहेत. देलनवाडी परिसरातील चुरचुरा गावाजवळ या हत्तींचे पहिले दर्शन झाले. त्यानंतर त्यांनी थेट मानापूर गावात धडक दिली.
गावात रस्त्यावर फिरणाऱ्या हत्तींचा थरार पाहून नागरिकांनी घाबरून सैरावैरा धाव घेतली. या गोंधळात एका महिलेला किरकोळ दुखापत झाली. विशेष म्हणजे, हत्ती पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. काही जणांनी त्यांचे व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला, तर काही जण तर सरळ त्यांच्या मागेच लागले. त्यामुळे संभाव्य जीवितहानी टळली हेच नशीब.
सध्या ही दोन्ही हत्ती सोनेरांगी जंगलात स्थलांतरित झाले असून, वनविभागाकडून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे. सहाय्यक वनसंरक्षक विजय धांडे यांनी माहिती दिली की परिस्थिती नियंत्रणात आहे; मात्र नागरिकांनी हत्तींपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या हत्तींच्या धुमाकूळीमुळे अनेक शेतकऱ्यांची उभी पिके उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे तात्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, गेल्या तीन वर्षांपासून रानटी हत्तींचा त्रास सुरू असूनही, अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. यामुळे वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. लोकप्रतिनिधींकडून अनेकदा आवाज उठवण्यात आला, तरीही ठोस पावले उचलण्यात आली नाहीत.
पुन्हा दोन टस्कर हत्तींच्या आगमनामुळे आता परिस्थिती गंभीर बनली आहे. हत्तींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी स्थानिक स्तरावरून मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे.
Comments are closed.